स्टीफन आणि जेन हॉकिंग एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची जोडपी. ऐन तारूण्यात हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, पुढे विवाहबंधनात अडकले. पंचवीस वर्षांचा संसार थाटला. कमी वयातच स्टीफनला मोटारन्यूरॉन म्हणजे मज्जासंस्थेच्या घातक आजाराने ग्रासलें. स्टीफन यांचं शरीर काम करणं बंद झालं त्यांचं आयुष्य व्हिलचेअरला खिळलं पण जेननं स्टीफन यांची साथ कधीच सोडली नाही. २५ वर्षे दोघांनी नेटानं संसार केला पण नंतर मात्र या दोघांनी घटस्फोट घेतला. एलिन मेसन या नर्स सोबत लग्न करण्यासाठी स्टीफन यांनी जेनला घटस्फोट दिल्याच्या त्यावेळी चर्चा होत्या. एलिन यांनी आजारपणात स्टीफन यांची सूश्रूषा केली होती पण एलिन सोबतही स्टीफन यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

स्टीफन आणि जेन यांनी १९६५ साली लग्न केलं. तेव्हा जेन २१ वर्षांची होती, तर स्टीफन त्यांच्यापेक्षा थोडा मोठा होता. दोघेही कॉलेजच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. स्टीफनला मोटारन्यूरॉन झाला असल्याची पूर्ण कल्पना जेनला होती. तो कधीही बरा होणार नाही, त्याला कधीही मृत्यू गाठू शकतो ही माहिती असताना देखील जेननं लग्नाला होकार दिला. २०१४ मध्ये या दोघांच्याही प्रेमकथेवर आधारीत’ द थिअरी ऑफ एव्हरिथिंग’ हा चित्रपटदेखील आला. स्टीफनपासून काडीमोड घेतल्यानंतर जेननं‘ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी – माय लाइफ विथ स्टीफन’ नावांचं आत्मकथनही लिहलं. स्टीफन आणि आपल्या नात्यावर तिनं यात तटस्थपणे भाष्य केलं.

‘स्टीफनला तरुणवयातच दुर्धर आजारानं ग्रासलं होतं, तो आणखी किती वर्षे जिवंत राहील याची शाश्वती नव्हती. मला त्याच्यासोबत जितके कमी क्षण मिळतील ते आनंदानं घालवायचे होते म्हणूनच आम्ही फार कमी वयातच विवाहबंधनात अडकलो’ असं जेन एका मुलाखतीत म्हणाली . १९९० साली आर्थिक आणि भावनिक कारणं देत स्टीफन हॉकिंग य़ांनी जेन यांना घटस्फोट दिला. स्टीफन यांचं आजारपण, दोघांचे भिन्न स्वभाव, यातून आलेल्या नकारात्मक भावना, तणाव यामुळे जेन आणि स्टीफनचे नंतर वारंवार खटके उडत असल्याचंही सांगितलं जात होतं. घटस्फोटानंतर जेननं जोनाथन जेन नावाच्या आपल्या संगीतकार मित्राशी लग्न केलं. तर स्टीफन यांनी एलिन मेसन यांच्यासोबत लग्न केलं पण स्टीफन यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही.