येत्या १०० वर्षांत माणसाला आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी पृथ्वी सोडून जावं लागेल. जगण्यासाठी नवीन ग्रह शोधण्याची वेळ मानवजातीवर येईल, असे भाकीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी वर्तविले आहे. ‘बीबीसी’ला दिलेल्या एक मुलाखतीत त्यांनी हे भाकीत केले. वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे माणसाला जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तेव्हा जिवंत राहायचे असेल तर माणसाला परग्रहावर स्थलांतर करणे गरजेचे होणार आहे, असे ते म्हणाले.

‘बीबीसी’च्या ‘टुमारोज वर्ल्ड’ या मालिकेतल्या ‘एक्स्पिडिशन न्यू अर्थ’ या माहितीपटासाठी स्टिफन हॉकिंग आणि त्यांचा जुना विद्यार्थी क्रिस्टॉफे गॅलफर्ड जगभ्रमंती करणार आहेत. यामध्ये माणूस अंतराळात कसा जिवंत राहू शकतो, यावर ते अधिक संशोधन करणार आहेत. पृथ्वीवरचे वातावरण आता बदलत चालले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. तेव्हा माणसांना जर आपले अस्तित्त्व टिकवायचे असेल तर त्यांनी मानवी वस्ती वसवण्यासाठी नवीन जागा शोधलीच पाहिजे, असा दावा त्यांनी केला. वाढती लोकसंख्या, बदलते हवामान, उल्कापात आणि अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना माणसाला भविष्यात करावा लागणार आहे. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीची त्याची लढाई पुढच्या काही वर्षांत सुरू होईल. तेव्हा १०० वर्षांत त्याला वस्ती वसवण्यासाठी दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.