तेलंगणमधील एका १८ वर्षीय तरुणाने होम आयसोलेशनसाठी घरात जागा नसल्याने ११ दिवस झाडावर वास्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. या तरुणाच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घर लहान असल्याने होम आयसोलेशनमध्ये राहता येणारं नव्हतं. त्यामुळेच त्याने आपल्यामुळे पालकांना आणि बहिणीला संसर्ग होईल या भितीने झाडावरच एकटं राहण्याचं ठरवलं. शिवा नाईक असं या तरुणाचं नाव असून त्याने झाडावर राहण्यासाठी एक मचान बांधली होती.

नालगोंडा जिल्ह्यातील कोथानानडीकोंडा गावामध्ये राहणारा शिवा हा इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. तो हैदराबादमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मात्र करोना निर्बंधांमुळे कॉलेज काही आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आल्यानंतर शिवा त्याच्या मूळगावी परतला. राज्य सरकारने गावामधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उभारलेल्या पशुखाद्य प्रकल्पाच्या ठिकाणी शिवा हमाली करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. मात्र अचानक एक दिवस शिवाला ताप आला आणि त्याला करोनाची लक्षणं असल्याचं जाणवू लागलं. शिवाने तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन करोनाची चाचणी केली. गावापासून पाच किमीवर असणाऱ्या या केंद्रामध्ये चाचणी करुन आल्यानंतर त्याला सौम्य लक्षणं दिसत असल्याने त्याने आयसोलेशनमध्ये रहावं असा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला दिला होता. सौम्य लक्षणांसाठी रुग्णालयामध्ये दाखल होण्याऐवजी आयसोलेशनचा पर्याय फायद्याचा असेल असं शिवाला सांगण्यात आलं. शिवाचा करोना चाचणीचा निकाल चार मे रोजी आला. ज्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

नक्की पाहा >> गरोदर महिलांचे लसीकरण, करोना होऊन गेलेल्यांना ९ महिन्यांनी लस अन्…; सरकारी पॅनलने मांडलेले १२ मुद्दे

लहानश्या घरामध्ये पालकांबरोबरच बहीणही राहत असल्याने आणि घरात एकच न्हाणीघर असल्याने होम आयसोलेशन शक्य नसल्याचं शिवाला समजलं. त्याच्या गावामध्ये आयसोलेशनची सुविधाही नव्हती. त्यामुळेच त्याने झाडावर राहण्याचा निर्णय घेतला. “माझ्याकडे काही पर्याय नव्हता. माझ्यामुळे घरच्यांना त्रास होऊ नये असं मला वाटतं होतं,” असं शिवाने तेलंगण टुडेशी बोलताना सांगितलं. करोना झालेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं असं वाचनात आल्याने शिवाने पुरेसा ऑक्सिजन मिळेल या हेतूने झाडावरच राहण्याचा निर्णय घेतला. घरासमोरच असणाऱ्या करंजाच्या झाडावर राहण्याचा निर्णय शिवाने घेतला. या झाडाचे गुणकारी फायदे असल्याने शिवाने याच झाडावर राहण्याचं ठरवलं.

शिवाने बांबू, काही दोऱ्यांच्या मदतीने झाडावरच एक मचान तयार केली. वाऱ्याने ही मचान हलणार नाही यासाठी ते झाडाच्या फांद्यांना घट्ट बांधली. शिवाने झाडाच्या एका फांदीला दोरीच्या सहाय्याने एक बादली बांधली होती. शिवाचे पालक त्याला लागणाऱ्या वस्तू, जेवण, पाण्याच्या बाटल्या या बादलीमधून त्याच्यापर्यंत पोहचवायचे.

शिवा फोनवरुन त्याच्या नातेवाईक, पालक आणि मित्रांच्या संपर्कात होता. तसेच या कालावधीमध्ये वेळ घालवण्यासाठी त्याला मोबाईलची मोठी मदत झाली. त्याने अनेकदा आपल्या फोनवरुन संबंधित अधिकाऱ्यांना आयसोलेशन सेंटरमधील जागेसंदर्भातील विचारपूस केली. तसेच शिवाच्या गावामध्ये रुग्ण वाढल्याने येथे आयसोलेशन सेंटर उभारण्याची मागणी गावातील अनेकजण सरकारी यंत्रणांकडे करु लागले. अखेर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या गावामध्ये आयसोलेशन सेंटर उभारलं. गावामध्ये मागास विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहासाठी राखून ठेवलेल्या इमारतीत हे सेंटर सुरु करण्यात आलं. शिवाने आपल्या क्वारंटाइनपैकी शेवटचे काही दिवस या सेंटरमध्ये काढले.