तुम्हाला कसं जगावं आणि कसं वागावं हे खरंच शिकायचं असेल तर आजूबाजूच्या लहान मुलांकडे बघा. ते तुम्हाला बरंच काही शिकवून जातील. म्हणजे बघा ना समोर एखादी अनोळखी व्यक्ती जरी असली तरी ते लहान मुल किती गोड हसतं ना! मी का हसू? मी याच्यासोबत माझा आनंद का वाटू? यासारख्या भावना त्यांच्या मनाला कधी स्पर्शतही नाही एवढं त्यांचं मन निरागस असतं. त्यांच्याकडे गरीब, श्रीमंत, ताकदवान असा काही भेद नसतोच त्यांच्यासाठी सगळेच सारखे असतात म्हणूनच तर आपल्यापेक्षा कमजोर असणाऱ्या एखाद्याची ते कधीच खिल्ली उडवत नाही. हा व्हिडिओच बघा ना! या लहानमुलांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला बरंच काही सांगून जाईल.

लहान वयातच एक पाय गामावल्यामुळे अपंगत्त्व आलेली छोटीशी अनू. शाळेत खेळाच्या तासाला आपल्या सगळ्या मित्रमैत्रींणांना दूरून खेळताना बघायची. आपले मित्र मैत्रिणी किती मज्जा करतात. फुटबॉल खेळतात, धावतात, पडतात पण सगळ्यांचा मनमुराद आनंद ते लुटतात. पण ती मात्र यातलं काहीच करू शकत नव्हती. मैदानातल्या एका बाकावर बसून आपल्या मित्र मैत्रिणींना खेळताना पाहून जो काही आनंद तिला मिळायचा त्यातच ती समाधान मानायची. पण शेवटी कितीही झालं तरी बालमन ते. जेमतेम सात वर्षांचं वयं तिचं तिलाही या सगळ्याची मजा अनुभवायची होती पण ते शक्य काही नव्हतं.

त्या दिवशी मात्र काही वेगळंच घडलं. तिचे सारे मित्र मैत्रिणी खेळण्यात व्यग्र होते तेव्हा कधीही धावू नकणारी अनू मात्र आपला गुलाबी रंगाचा कृत्रिम पाय लावून धावत मैदानात आली. खरंतर अनूचं धावण इतरांसारखं नव्हतं पण तरीही तिची खिल्ली न उडवता तिला बघून तिच्या चिमुकल्या मैत्रमैत्रिणींनी जी काही प्रतिक्रिया दिली ती तुम्हाला आयुष्यात बरंच काही शिकवून जाईल हे नक्की. व्हिडिओ जरी काही सेकंदाचा असला तरी समोरच्या व्यक्तीशी त्यातूनही तुमच्यापेक्षा दुबळ्या असलेल्या व्यक्तीशी कसं वागावं याबद्दल खूप काही शिकवून जातो. म्हणूनच तर सोशल मीडियावर आपल्या प्रोस्थेटिक लेगवर धावणाऱ्या अनूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.