कोण म्हणतं की आजकाल संसार फार काळ टीकत नाही ? असे असेल तर तुम्हाला या जोडप्याला भेटलेच पाहिजे कारण या जोडप्याने सहजीवनाची ८८ वर्षे पूर्ण केली आहेत. प्रत्येकाच्या जगण्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, त्यातून एकमेकांना वेळ न देणे, एकमेकांशी सूर न जुळणे अशा एक ना अनेक तक्रारी करत अनेक जण एकमेकांची साथ मध्येच सोडतात, अशा सगळ्यांनी या जोडप्यांपासून आदर्श घेतला पाहिजे. करम चंद आणि कर्तरी गेल्या ८८ वर्षांपासून एकत्र आहे. जगातील सर्वाधिक काळ एकत्र राहिलेले जोडपे म्हणून या जोडप्याची जगभरात चर्चा आहे. मुळचे भारतीय असलेले करमचंद हे १९६० च्या दशकात इंग्लडमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपला संसार फुलवला.

ज्या देशात घटस्फोटाचे किंवा विभक्त राहण्याचे प्रमाण अधिक आहे अशा प्रत्येकाला या जोडप्याचे उदाहरण दिले जाते. करमचंद आणि कर्तरी या दोघांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. पण आजही एका तरूणाला लाजवेल इतका उत्साह आणि जगण्याची उमेद या दोघांमध्ये आहे. करम चंद यांना ८ मुले, २६ नातवंड आणि २७ पतवंड आहेत. या सगळ्याच्या संगतीत त्यांचा संसार छान फुलला आहे. पतवंडासोबत खेळ खेळणे, त्यांना गोष्टी सांगणे, पंजाबी गाण्यांवर नाचगाणी करणे हे सारे काही हे दोघेही उत्साहात करतात. त्या दोघांनी असेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ द्यावी अशी आशा या जोडप्याला पाहून प्रत्येक जण व्यक्त करतो.