ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा आज (शनिवार) शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या पोशाखापासून ते केकपर्यंत बऱ्याच गोष्टी विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. तर जाणून घेऊयात या विवाहसोहळ्यातील केकबद्दल..

नेहमीप्रमाणे चार-पाच थरांचा केक यंदा नसून तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हा केक असणार आहे. एल्डरफ्लावर सिरपमध्ये मुरवलेल्या लेमन स्पंजने हा केक तयार करण्यात आला असून त्यावर लेमन कर्ड आणि स्विस मेरिंग एल्डरफ्लावर बटरक्रीम पसरवण्यात आला आहे. राजघराण्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीची माहिती देण्यात आली आहे. लंडनच्या वायोलेट बेकरीच्या क्लेअर पॅकनं हा केक तयार केला आहे.

खरंतर केन्सिंग्टन पॅलेसनं केकच्या किंमतीविषयी अधिकृत माहिती दिली नसून पॅक केकसाठी जेवढी किंमत मोजतो त्यावरून या विवाहसोहळ्यातील केकच्या किंमतीचा अंदाज लावता येऊ शकतो. या विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यांच्या संख्येवरून त्याची किंमत ठरवता येऊ शकते. ‘डेलिश डॉटकॉम’ या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, रिसेप्शनला उपस्थित राहणाऱ्या जवळपास ६०० पाहुण्यांसाठी हा केक लागणार आहे. १५० लोकांसाठी पॅक जवळपास १०५७ डॉलर म्हणजेच सुमारे ७१ हजार रुपये घेतो. शाही विवाहसोहळ्यातील ६०० पाहुण्यांचा विचार केला असता त्याची किंमत जवळपास ४२२८ डॉलर म्हणजेच सुमारे २ लाख ८७ हजार रुपये इतके होतात. याशिवाय केक सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खऱ्याखुऱ्या फुलांचे १३५ डॉलर म्हणजेच सुमारे ९ हजार रुपये अधिकचे घेण्यात येणार.

प्रिन्स विल्यम आणि केटच्या विवाहसोहळ्यात ८ थरांचा केक तयार करण्यात आला होता. त्यानंतर पाहुण्यांमध्ये देण्यासाठी त्याचे जवळपास ६०० तुकडे करण्यात आले होते. याव्यतिरिक्त अधिकचे ४ हजार फ्रुटकेकचे तुकडे छोट्याशा डब्यात भरून भेट म्हणून देण्यात आले होते.