अमेरिकेतील टेक्सासमधील एका करोना विशेष रुग्णालयामध्ये डॉ. जोसेफ व्हॅरॉन हे सलग २५२ दिवशी कामासाठी हजर झाले. कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातील आयसीयूमध्ये एक वयस्कर व्यक्ती निराश होऊन, चेहरा पाडून बसलेल्याचे दिसले. हा दिवस अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हींगचा दिवस होता. म्हणजेच एकमेकांचे आभार मानण्याचा हा दिवस. पीपीई कीट घालून रुग्ण सेवेसाठी तयार झाल्यानंतर डॉ. जोसेफ यांनी आयसीयूमध्ये जाऊन या वयस्कर व्यक्तीला मिठी मारली. हा क्षण एका फोटोग्राफरने आपल्या कॅमेरात कैद केला आणि तो जगभरात व्हायरल झाला.

ह्युस्टन येथील युनायटेड मेमोरियल मेडिकल सेंटरचे प्रमुख असणाऱ्या डॉ. जोसेफ यांनी यासंदर्भात सीएनएनला माहिती दिली. मी जेव्हा करोना आयसीयूमध्ये प्रवेश करत होतो तेव्हा मला ही वयस्कर व्यक्ती दिसली. ही व्यक्ती आपल्या बेडवरुन उठून आयसीयूच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. मला पाहताच या व्यक्तीला रडू आलं. मी नंतर त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना तुम्ही का रडत आहात असं विचारल्याचं डॉ. जोसेफ सांगतात.

(फोटो सौजन्य : एएफपी)

रडत रडतच त्या व्यक्तीने, “मला माझ्या पत्नीसोबत रहायचं आहे,” असं म्हटलं. ते शब्द ऐकल्यानंतर डॉ. जोसेफ यांनी या व्यक्तीला मिठी मारली. “मला त्यांच्या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटलं. मी ही त्यांचं बोलणं ऐकून एकदम दु:खी झालो. मी मिठी मारुन धीर दिल्यानंतर त्यांचं रडणं थांबलं,” असंही जोसेफ यांनी सीएनएननला सांगितलं.

“मला या साऱ्या प्रसंगामुळे रडू का आलं नाही ठाऊक नाही. मात्र माझ्या सोबतच्या नर्स रडू लागल्याचे मी पाहिले,” असं जोसेफ यांनी सांगितलं. करोनाच्या रुग्णांना आयसोलेशन मध्ये राहणं फार कठीण जातं. अनेकदा वयस्कर व्यक्तींना असं एकटं रहाणं खूपच कठीण जातं, असं जोसेफ म्हणाले. “म्हणजे तुम्ही विचार करुन बघा की तुम्ही अशा एका रुममध्ये आहात की जिथे लोकं स्पेससूट घातल्याप्रमाणे कपडे घालून येतात. त्यातच रुग्ण वयस्कर असेल तर त्याला हे सारं फार कठीण जातं कारण त्याला एकटेपणा अधिक जाणवतो. त्यांच्यापैकी काहीजण रडतात तर काही पळून जाण्याचा प्रयत्न करतात. आमच्याकडे एकाजणाने तर खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता,” अशा शब्दांमध्ये जोसेफ यांनी वयस्कर व्यक्तींना होणाऱ्या त्रासासंदर्भात भाष्य केलं.

व्हायरल झालेल्या फोटोमधील वयस्कर व्यक्ती आता सावरली आहे अशी माहिती जोसेफ यांनी दिला. काही दिवसांमध्येच ते ठणठणीत बरे होऊ स्वत:च्या घरी जातील असा आम्हाला विश्वास आहे, असं जोसेफ यांनी आठवडाभरापूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

करोनाच्या काळामध्ये सूचना आणि आरोग्यासंदर्भातील गोष्टींना फारसं महत्व न देणाऱ्यांसाठी जोसेफ यांनी या मुलाखतीमधून एक संदेश दिला आहे. “लोकं सध्या बार, हॉटेल आणि मॉल्समध्ये फिरत आहेत. हा वेडेपणा आहे. लोकं नियम आणि सुरक्षेसंदर्भातील गोष्टी ऐकत नाही आणि मग आमच्या रुग्णालयामध्ये आयसीयूत दाखल होतात. मला लोकांना अशा परिस्थितीमध्ये मिठी मारण्याची इच्छा नक्कीच नाहीय. त्यामुळेच लोकांना किमान गोष्टींचं पालन करावं. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, हात वारंवार धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे यासारख्या गोष्टींचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. लोकांनी एवढं केलं तरी आमच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांना थोडा आराम करता येईल,” असंही जोसेफ म्हणाले.