अमेरिकेत सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यापासून देशभर सर्वत्र हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. अमेरिकेतल्या वेगवेगळया राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या या आंदोलनाचे लोण आता ब्रिटनमध्येही पसरले आहेत. ब्रिटनमधील काही आंदोलकांनी एडवर्ड कोल्स्टन या व्यक्तीचा पुतळा हटवला आहे. एडवर्ड व्यक्ती मजुरांचा व्यापार करत असल्याने आंदोलकांनी त्याचा पुतळा पाडल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता आंदोलकांनी भारताला ब्रिटीशांच्या गुलामगिरीमध्ये ढकलणाऱ्या रॉबर्ट क्लाइव्हचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात चेंज डॉट ओरआरजी या वेबसाईटवर एक ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली असून अनेकांनी या याचिकेला पाठिंबा दिला आहे. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन करण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या रॉबर्ट क्लाइव्हचा पश्चिम इंग्लंडमधील श्रूजबेरी येथे पुतळा आहे.

वंशवृध्दाविरोधीत सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या वेळी ब्रिस्टलमध्ये असणारा एडवर्ड कोल्स्टनचा पुतळा आंदोलकांनी पडला आणि नदीत फेकून दिला. रविवारी हा सर्व प्रकार घडल्यानंतर लगेचच चेंज डॉट ओरआरजीवर स्थानिक श्रॉपशायर काउंटी कौन्सिलला उद्देशून रॉबर्ट क्लाइव्हचा पुतळा हटवण्यासंदर्भात एक याचिका पोस्ट करण्यात आली आहे. ‘रॉबर्ट क्लाइव्ह हा भारत, बंगाल आणि दक्षिण-पूर्व आशिया खंडातील बर्‍याच प्रदेशांमधील ब्रिटिश वर्चस्व निर्माण करण्यासाठी काम करणारा अधिकारी होता,’ असं या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेला अडीच हजार लोकांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे याचिका पोस्ट करणाऱ्याने म्हटले असून त्यापैकी १७०० हून अधिक जणांनी याचिकेवर सहमत दर्शवले आहे.

फोटो सौजन्य: Twitter/OwenJones84

“क्लाइव्ह हा ब्रिटिश वसाहतवादाचे प्रतीक आहे. त्याने भारतीय, बंगाली आणि दक्षिण-पूर्व आशियाई वंशाद्वेषाचा आधार घेत काम केलं. ब्रिटिशांचा अभिमान आणि राष्ट्रवाद कायम रहावा तसेच ज्या कोट्यधीश निष्पाप लोकांचा छळ व खून झाला त्यांना न्याय मिळावा म्हणून हा पुतळा काढला पाहिजे,” असा युक्तीवाद या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. याच याचिकेमध्ये क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली बंगाल प्रांतामध्ये मोठी लूटपाट करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलं आहे.

‘एखाद्या राष्ट्राचा नाश करणार्‍या आणि निरपराध लोकांची हिंसक आदेशांच्या माध्यमातून अडवणूक करणाऱ्या माणसाची आठवण म्हणून पुतळा ठेवणे आक्षेपार्ह आणि लाजिरवाणेही आहे. या व्यक्तीच्या नावाला केवळ ऐतिहासिक संदर्भ असल्याने तो चांगला ठरत नाही.  शेकडो वर्षांपासून श्रूजबेरी शहराच्या केंद्रभागी असणारा हा पुतळा म्हणजे दडपशाही आणि पांढऱ्या रंगाच्या लोकांच्या वर्चस्वाचे म्हणजेच वर्णद्वेषाचे प्रतिक आहे. ही प्रतिकृती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे या ठिकाणी उभी करण्यात आली असावी’, असंही या याचिकेत म्हटलं आहे. रॉबर्ट क्लाइव्ह १८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत काम करायचा. तो बंगाल प्रांताचा राज्यपाल होता. त्याला ‘क्लाइव्ह ऑफ इंडिया’ म्हटले जायचे.
फोटो सौजन्य: change.org

हजारच्या वर प्रतिसाद मिळणाऱ्या याचिंकावर चर्चा केली जाते असं स्थानिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं असल्याने आता या पुतळ्यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईलच.