भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटरवर सक्रिय असणा-या नेत्यांपैकी एक आहेत. ट्विट करुन कोणी मदत मागितली आणि स्वराज यांनी ती केली नाही असे क्वचितच होते. म्हणूनच त्यांनी आतापर्यंत अनेकांची मने जिंकली आहे. पण यावेळी मात्र मदत न मागता फक्त फेसबुक पोस्ट वाचून त्या मदतीला धावून आल्या आहेत.

वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाला उपचारासाठी तरी अमेरिकेत प्रवेश द्या! सिरियन वडिलांची ट्रम्प यांना विनंती

मुळची चेन्नईची असलेली चरण्ण्या कानन ही सध्या हावर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकते. एका प्रकल्पासाठी ती, ३९ जणांसोबत टांझानियामध्ये गेली होती. पण हा अनुभव तिच्यासाठी सगळ्यात वाईट अनुभव ठरला . येथे पोहोचल्यावर काही चोरांनी तिला लुटले. पैसे, मोबाईल, क्रेडीट कार्ड, पासपोर्ट सारे काही गेले. अमेरिकेत परतायला तिला काहीच मार्ग नव्हता. तिने टांझानियामध्ये असलेल्या भारतीय दूतावासाकडे मदत मागितली. पण तिथून काही तिला मदत मिळाली नाही. मदत करण्यापेक्षा भारतीय दूतावासातील एका अधिका-याने आपल्याला उडवाउडवीची उत्तरे दिली असे ट्विट तिने केले. मदत तर सोडाच पण ट्विट करून दूतावासातून कोणती मदत मिळते का ते बघ असा खोचक सल्लाही तिला दिला. पदरात पडलेला हा सारा वाईट अनुभव तिने लिहून काढला अन् फेसबुकवर शेअर केला.

वाचा : आजोबांसाठी कायपण!

सोशल मीडियावर सक्रिय असणा-या सुषमा स्वराज यांच्या वाचनात तिची पोस्ट आली. स्वराज यांनी तिची माफी मागत ज्या अधिका-यांनी तिची मदत केली नाही त्याचे नाव विचारले आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही तिला दिले. याच वेळेत चरण्ण्याने इतर ठिकाणी असलेल्या दूतावासातील आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला आणि सुखरूप ती अमेरिकेत पोहोचली.