लॉकडाउनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत. १ मे रोजी जेव्हा रेल्वेकडून पहिल्या श्रमिक ट्रेनची घोषणा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांनी अडकलेल्या लोकांना घरी पोहोचवण्यासाठी ५०० विशेष ट्रेन धावणार असून १५ दिवसांत सर्व स्थलांतरितांना आपल्या घरी पोहोचवण्याचं काम पूर्ण होईल असं सांगितलं होतं. पण या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची इच्छा असूनही तिकीट किंवा सीट न मिळालेलेही अनेकजण आहेत. अशाच पद्धतीने श्रमिक ट्रेनचं तिकीट न मिळालेल्या उत्तर प्रदेशच्या मजुराने थेट कारच विकत घेतली. लल्लन असं या मजुराचं नाव आहे.

IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, लल्लन तीन दिवस श्रमिक ट्रेनचं तिकीट मिळवण्यासाठी स्थानकावर वाट पाहत उभा होता. पण तिकीट मिळत नसल्याचं पाहून चौथ्या दिवशी त्याने थेट बँक गाठली आणि जमवलेले सगळे १ लाख ९० हजार रुपये काढले. यानंतर तो थेट सेकंड हॅण्ड कार विकत घेण्यासाठी पोहोचला. लल्लन यांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील पैसे खर्च करत दीड लाखात कार विकत घेतली आणि कुटुंबाला घेऊन गोरखपूरला आपलं घर गाठलं. लल्लन याने आपण पुन्हा कधीही परतणार नसल्याचंही यावेळी म्हटलं आहे.

“लॉकडाउननंर सर्व काही सुरळीत होईल या आशेने आपण थांबलो होतो. पण जेव्हा लॉकडाउन वाढू लागला तेव्हा आपल्या घरी जाणं माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षित असल्याचं लक्षात आलं. ट्रेन किंवा बसमध्ये तिकीट मिळावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही,” असं लल्लन यांनी सांगितलं आहे.

“अनेक बसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यामुळे आपल्या कुटुंबाला करोनाची लागण होईल अशी भीती मला वाटायची. अखेर जेव्हा श्रमिक ट्रेनचंही तिकीट मिळालं नाही तेव्हा मी कार विकत घेऊन घर गाठण्याचा निर्णय घेतला. मला माहिती आहे मी आयुष्यभराची कमाई खर्च केली आहे, पण किमान माझं कुटुंब सुरक्षित आहे,” असंही लल्लन यांनी म्हटलं आहे.

२९ मे रोजी लल्लन यांनी आपल्या कुटुंबासोबत गाजियाबादहून गोरखपूरसाठी प्रवास सुरु केला. १४ तासांच्या प्रवासानंतर ते आपल्या घरी पोहोचले. सध्या होम क्वारंटाइन असणारे लल्लन गोरखपूरमध्ये आपल्याला काम मिळेल अशी आशा व्यक्त करत आहेत. जर मला इथे काम मिळालं तर पुन्हा गाजियाबादला जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.