सांबराने शिकार करण्यासाठी आलेल्या बंधुकधार्याचा जीव घेतल्याची घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. शिकाऱ्याचीच शिकार झाल्यामुळे अनेकांना याचं आश्चर्य वाटलं होतं. मृत्यू पावलेल्या शिकाऱ्याचे नाव थॉमस अलेक्झांडर असे आहे. तो ६६ वर्षांचा होता. थॉमसच्या हातात बंदूक असूनही सांबराने त्याचा जीव घेतल्यामुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आलं.

अमेरिकेतील स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसारनुसार, ६६ वर्षीय थॉमस अलेक्झांडर शिकारी करण्यासाठी ओझार्कच्या डोंगराळ भागात गेला होता. थॉमसने सांबरावर नेम धरून गोळी झाडली अन् ते खाली पडले. थॉमस दबक्या पावलाने पडलेल्या सांबराजवळ पोहचला. त्याने सांबराच्या छातीजवळचा भाग पाहायला सुरूवाच केली. पण सांबराने अचानक उठून थॉमसवर हल्ला चढवला. यामध्ये थॉमस गंभीर जखमी झाला.

सांबराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या थॉमसने पत्नीला फोन केला. पत्नीनेही घटनेची गांभिर्य समजून माहिती तात्काळ आपत्कालीन विभागाला दिली. आपत्कालीन विभागाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले अन् त्यांनी थॉमसला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत थॉमसचा मृत्यू झाला होता.

२० वर्षाच्या करियरमध्ये अशी घटना घडली नसल्याचे स्थानिक आधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. ६६ वर्षीय थॉमसच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनच्या अहवालामध्ये स्पष्ट होईल. पण डॉक्टरांनी थॉमसच्या अंगावर धारदार वस्तूने खुपसल्याच्या खुणा असल्याचं म्हटलेय. सांबराच्या हल्ल्यामुळे या जखमा झाल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.