जगभरातील डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य विभागाशी संबंधित सर्वच कर्मचारी करोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीच्या फळीमधील करोनायोद्धे म्हणून लढत आहेत. मागील सहा महिन्यापासून जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाविरुद्धचे हे युद्ध सुरु असून यामध्ये शेकडो डॉक्टर्सला प्राणही गमावावे लागले आहेत. करोनामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढला आहे. त्यामुळेच डॉक्टरांना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावं लागत आहे. बरं काम करतानाही त्यांना स्वत:ला संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई कीट्स म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट घालून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.

करोनाविरोधातील लढ्यामध्ये या लोकांच्या अथक प्रयत्नांमुळेच या साथीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच करोनाची बाधा झालेल्यांचीही संख्याही वाढत आहे. त्यामुळेच अनेकदा करोना रुग्णांच्या संख्येनुसार डॉक्टरांच्या कामाचे तास वाढताना दिसत आहेत. मात्र या सर्व रुग्णांवर उपचार करताना अगदी केसापासून नखापर्यंत स्वत:ला पीपीईमध्ये झाकूनच डॉक्टरांना करोना रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. या पीपीई कीटमध्ये डॉक्टरांना अनेकदा दिवसातल्या १२ तासांपेक्षा अधिक काळही ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळेच पीपीई कीटमध्ये एखाद्या भट्टीमध्ये असल्यासारखा अनुभव डॉक्टरांना येत असून त्यामध्ये प्रचंड गरम होतं. डॉक्टरांना या पीपीई कीटमध्ये किती त्रास होत असेल याची झलक दाखवणार एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचारी असणारी महिला आपलं पीपीई कीट काढते तेव्हा त्यामधून जवळजवळ बादलीभर घाम बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.  पायातील पीपीई कीटमधील ट्राउझर काढल्यानंतर या ट्राउझरमध्ये साठलेला घाम जमीनीवर परसताना दिसतो.

चीनमधील पिपल्स डेलीने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ ८ ऑगस्ट रोजी शिनझँगमधील उरुमकी येथे काढण्यात आला आहे. वैद्यकीय कर्मचारी ब्रेक घेण्यासाठी आले असताना हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डॉक्टरांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपण संवेदनशील राहणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे.