जगभरात भारत हा देश विविधतेत एकतेसाठी ओळखला जातो. याचेच उदाहरण नुकतेच पहायला मिळाले. एका व्हिडियोद्वार धार्मिक सलोख्याचे दर्शन घडले. फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया माध्यमांवर हा व्हिडियो मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती नमाज पढत असल्याचे दिसत आहे. पण तो व्यक्ती मशिदीत नमाज पढत नसून तो गुरुद्वारामध्ये हे करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्यक्ती नमाज पढत असताना त्याच्या मागे गुरुद्वारामध्ये म्हटली जाणारी गुरबानी ऐकू येत आहे. गुरुद्वारामध्ये उपस्थित असलेले शीख बंधू हे ऐकते असतानाच एका कोपऱ्यात ही व्यक्ती नामज पठण करत आहे. ही गोष्ट याठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

ही घटना मलेशियामध्ये घडल्याचे म्हटले जात असले तरीही त्याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. जगभरात गुरुद्वारामध्ये घडणाऱ्या घटनांचा आढावा एका फेसबुक पेजद्वारे घेतला जातो. त्यावर हा व्हिडियो शेअर करण्यात आला आहे. या व्यक्तीला आपल्या जवळपास मशिद सापडली नसल्याने त्याने गुरुद्वारामध्ये येऊन नमाझ पठण केले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेकांनी हा व्हिडियो आपल्या वॉलवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे गुरुद्वारामध्ये नमाज पठण करत असताना गुरुद्वारातील कोणीही त्या व्यक्तीला तसे करण्यावाचून रोखले नाही.