पुढचा ५२ सेकंदाचा व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत बघा. बाकी गोष्टी नंतर

लाईफमध्ये येडे …ठाssर येडे खूप असतात. त्यातलाच हा एक. या व्हिडिओच्या शेवटी शेवटी नांरिंगी रंगाचे जॅकेट्स घातलेल्या या रेल्वे कामगारांपैकी एकाने (जवळपास टपकलेल्या) त्या माणसाला मारायला सुरूवात केलेली दिसते. हा व्हिडिओ जवळपास त्याचवेळी संपतो. पण हा व्हिडिओ रेकाॅर्ड करणाऱ्याने जरा धीर धरत आणखी रेकाॅर्डिंग केलं असतं तर या कामगारांनी या माणसाची केलेली धुलाई बघायला मिळाली असती.

रेल्वे ट्रॅकवरून सायकल न्यायची इच्छा मनात येणं यासाठीही महान माणसं जन्माला यावी लागतात. याने सायकल नेली, तो पडला, त्याच्या सायकलवर असणारं सगळं सामान पडलं. आता सामान पडलं तर उचल आणि चालायला लाग ना. अॅटिट्यूड कशाला मारतोय? त्याच्या सायकलवरून त्याचं सामान पडल्यानंतर ज्या स्टाईलमध्ये तो हावभाव करतोय ते पाहून ‘मैं पहले बहुत निराश था’च्या टेलिशाॅपिंगच्या जाहिरातींची आठवण येते

हा त्याचं सामान उचलेपर्यंत मागून ट्रेन आलेली दिसते. हे बाकीचे कामगार लोकं सुध्दा बोंबलत असतील पण याला काही एेकू गेलेलं दिसत नाहीये ( म्हटलं ना ‘महान’?).

जाँटी ऱ्होड्सचा दूरचा नातेवाईक असण्याची शक्यता असलेल्या त्या रेल्वे कामगाराने डाईव्ह मारत या ठोकळ्याला फुटवला नसता तर त्याचं आणखी सामान नष्ट झालं असतं (म्हणजे त्याचे शूज्, जॅकेट वगैरे हो!)

झाल्या त्या मूर्खाला शिव्या घालून? आता आपल्यापैकी किती जण गाणी एेकत किंवा कार ड्राईव्ह करत असताना गाडीतल्या स्क्रीनवर सिनेमा पाहतात. हो! असे नग भरपूर आहेत. तुम्ही कधी बाईकवर वगैरे असाल तर चौकामध्ये बाजूच्या रस्त्यावरून मागे पुढे न पाहता वाहनं रेटणारे किमान दोघंतरी भेटतात. मधमाशांसारखं कणाकणाने ज्ञान मिळवणाऱ्या समस्त बुध्दिवंतांचं कोडाळं असणाऱ्या पुणे शहरातल्या नागरिकांच्या डोक्यावर हेल्मेट घालायला सरकारने सांगितलं तर त्याच्याविरोधात मोर्चे निघतात. वराहमिहीरांपासून कमाल राशिद खानपर्यंतच्या सगळ्या तत्वचिंतकांचे विचार लावले तरी कुठल्या लाॅजिकमध्ये बसते हो हे?

विनोदाचा भाग सोडा, समोरचा स्मार्टफोन न सोडता खिशात टाका आणि किमान….किम्मान आपण वनपीसमध्ये राहू (वात्रटपणा नको भावार्थ महत्त्वाचा) एवढे तरी आसपासच्या जगाकडे लक्ष द्या!

शेवटी जाँटी ऱ्होड्सचे नातेवाईक काय जगभर पसरले नाहीयेत.