रस्त्यावर फेकला जाणारा कचरा, प्लास्टिकची योग्य विल्हेवाट होत नसल्यास काय होऊ शकतं याबद्दल सर्वांनाच जागरुक करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फरिदाबाद येथे दुर्घटनेत जखमी झालेल्या गाईवर सर्जरी करण्यात आली असता डॉक्टरही चक्रावून गेले. गाईवर जवळपास चार तास सर्जरी सुरु होती. यावेळी गाईच्या पोटात तब्बल ७१ किलो प्लास्टिक सापडलं. इतकंच नाही तर नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक गोष्टी आढळल्या. ही घटना आपल्या सर्वांनाच जागं करणारी असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाईवर सर्जरी करण्यासाठी तीन सदस्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. गाईवरील सर्जरी यशस्वी झाली असली तरी गाय मात्र अद्यापही धोक्यात आहे. पुढील १० दिवस अत्यंत महत्वाचे असणार आहेत अशी माहिती डॉक्टर अतुल मौर्य यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

एका कारने दिलेल्या धडकेत गाय जखमी झाली होती. गाईला जनावरांच्या देवाश्रय रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी गाय आपल्या पोटावर लाथ मारत असल्याचं डॉक्टरांना आढळलं. पोटदुखीमुळे गाईला प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांनी काही चाचण्या आणि एक्स-रे काढल्यानंतर पोटात धोकादायक गोष्टी असल्याचं समोर आलं.

यानंतर सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाईचं पोट साफ करण्यासाठी आम्हाला चार तास लागले. यामध्ये प्लास्टिक सर्वाधिक होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. याशिवाय नाणी, काचेचे तुकडे, स्क्रू, पिन, सुई अशा अनेक नष्ट न होणाऱ्या गोष्टीही सापडल्या आहेत. आपल्या सर्वांसाठीच ही धोक्याची घंटा असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 71kg of plastic metal inside a cows stomach sgy
First published on: 25-02-2021 at 09:45 IST