मध्य प्रदेशात चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालत त्याला बोनेटवेरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने चालकाला मोबाइल फोनवर बोलत असल्याने रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या चालकाने गाडी थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच घातली. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
वाहतूक पोलीस कर्मचारी शिव सिंग चौहान यांनी गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असल्याने चालकाला थांबवलं होतं. दंड भरण्यास सांगण्यात आलं असता चालक संतापला आणि गाडी सुरु केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने बोनेटवर चढून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण चालकाने गाडी न थांबवता चार किमीपर्यंत त्याला फरफटत नेलं. पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी अखेर गाडीला घेरलं आणि त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त केली आहे. आपल्याकडे या शस्त्रांचा परवाना असल्याचा चालकाचा दावा असून आपण त्यासंबंधी चौकशी करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
शिव सिंग चौहान यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीने जोरात ब्रेक दाबत अनेकदा आपल्याला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तसंच अनेकदा इतर वाहनांच्या जवळ गाडी नेत मला इजा पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण मी बोनेटला घट्ट पकडून होतो”.