अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आल्यानंतर आपचे नेते कुमार विश्वास यांनी पाकिस्तानवर ‘ट्विटरबॉम्ब’ टाकला आहे. आता बस्स झालं, देशानं संयमाची हद्द निश्चित करावी; नाही तर कुत्र्याचे शेपूट उखडून टाकावे. सीमेपलिकडील देशाशी व्यापार, संवाद-संपर्क सर्व काही तोडून टाकावं, असं ट्विट विश्वास यांनी केलं आहे. तसंच त्यांनी केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत.
अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात सहा महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला. तर इतर ३२ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर आपचे नेते कुमार विश्वास यांनी पाकिस्तानवर तोफ डागली आहे. आता बस्स झालं, कुत्र्याचे शेपूट उखडून टाकावे. सीमेपलिकडील देशाशी व्यापार, संवाद-संपर्क सर्व काही तोडून टाकावं, असं ट्विट विश्वास यांनी केलं आहे. काही वेळातच विश्वास यांचं हे ट्विट व्हायरल झालं आहे. आतापर्यंत २५०० जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. अनेक यूजर्सने विश्वास यांचं कौतुक केलं आहे. तर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भारत हा एक असा महान देश आहे की, येथे हज यात्रा यशस्वी पार पडते, मात्र अमरनाथ यात्रेत निष्पाप लोकांना मारलं जातं, असं उपरोधिकपणे काहींनी म्हटलं आहे. कुमार विश्वास पाकिस्तानवर हल्लाबोल करून थांबले नाहीत. त्यांनी केंद्र सरकारलाही सुनावलं. हा शिव-श्रद्धेवरील हल्ला असून, दिल्लीतील केंद्र सरकारनं शरणागती पत्करली का, असा सवाल विश्वास यांनी ट्विटमधून केला आहे. तत्पूर्वी, अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर – ए-तोयबाचा हात असून, पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.