दिवा, रांगोळी, कंदील ही नावं घेतली की साहजिकच ‘दिवाळी’ हा सण आठवेल. पण यंदाच्या दिवाळीत सोशल मीडियावर या नावांना वेगळंच महत्त्व आहे. यामागचं कारण म्हणजे ‘गुगल पे’. या पेमेंट अॅपने सध्या युजर्सना अक्षरश: वेड लावलंय. दिवाळीदरम्यान या अॅपने युजर्ससाठी एक नवीन योजना आणली. यात दिवा, रांगोळी, कंदील, फुल आणि झुमका असे पाच विविध स्टँप युजरला गोळा करायचे आहेत. हे पाचही स्टँप गोळा केल्यास संबंधित युजरला २५१ रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे. ३१ ऑक्टोबर ही या योजनेची अंतिम तारीख होती आणि बहुतांश युजर्सना फक्त रांगोळीचा स्टँप मिळत नव्हता. अशावेळी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर काही भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत.

दिवा, कंदील, झुमका आणि फूल हे स्टँप सहजपणे मिळतात पण रांगोळीचा स्टँप मात्र कोणालाच मिळत नाहीये. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे तर काहींनी तर अॅप अनइन्स्टॉल करून रेटिंगमध्ये त्याला एकच स्टार देण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

‘गुगल पे’नं आता हे स्टँप गोळा करण्याची तारीख वाढवली आहे. आता ११ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.