Ayodhya Ram Mandir Ananad Mahindra Post: अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिराच्या उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यच्या जगभरातील राम भक्त उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला अभिषेक सोहळा पार पडणार आहे. हा कार्यक्रम दुपारी १२.२० वाजता अभिजित मुहूर्तावर सुरू होणार आहे. या कार्यक्रमानंतर मोदी ७,००० हून अधिक राम भक्तांच्या मेळाव्याला संबोधित करतील. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी अनेक मोठमोठ्या व्यावसायिकांना, कलाकारांना, खेळाडूंना व जगभरातील राम भक्तांना आमंत्रित करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वी आता महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या कामगारांचे किंवा असं म्हणूया या कलाकारांचे बोलणे ऐकून महिंद्रा सुद्धा भारावून गेले आहेत. नेमकं असं या मंडळींनी काय म्हटलंय पाहूया.

आनंद महिंद्रा काय म्हणाले?

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत असताना, इंग्लंडमधील एका प्रसिद्ध कथेचा संदर्भ देत या मंडळींचे कौतुक केले आहे. महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सतराव्या शतकात सेंट पॉल कॅथेड्रलच्या स्थळाला भेट देणाऱ्या वास्तुविशारद ख्रिस्तोफर रेनची इंग्लंडमधील एक प्रसिद्ध कथा आहे. त्याने वीटभट्ट्यांमधील तीन कामगारांना प्रश्न केला होता की तुम्ही काय करताय आणि तिघांनी सुद्धा वेगवेगळे उत्तर दिले. एक म्हणाला, “मी विटा रचत आहेत”, एक म्हणाला “मी भिंत बांधत आहे”, तिसरा म्हणाला, “मी कॅथेड्रल बांधत आहे”. ही कथा जगभरातील प्रत्येक बिझनेस स्कूलमध्ये शिकवली जाते. जेव्हा लोक एखाद्या मोठ्या हेतूने किंवा ध्येयाने काम करत असतात तेव्हा त्यांचे काम तितकेच उच्च प्रतीचे असते. आता या गोष्टीचं कौतुक वाटतं की अशीच एक कथा आपल्या भारतात सुद्धा आहे. उच्च ध्येयाने भारावलेल्या कामगारांनी हे मंदिर बांधले आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंद महिंद्रा पोस्ट

राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी काय म्हटलं?

राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्यांनी टाइम्स नाऊच्या व्हिडिओमध्ये असे म्हटले होते की, “आम्हाला याचेच कौतुक आहे ही आम्ही रामाचे मंदिर बांधत आहोत. आम्हाला अजिबातच थकवा जाणवत नाही. आम्ही आम्ही २४- २४ तास काम करूनही स्वतःला थांबवू इच्छित नाही. जर कधी थकवा वाटलाच तर फक्त एकदा रामाच्या नावाचा जयघोष करायचो आणि अचानक उत्साह व ऊर्जा जाणवायची. २८ तास काम केल्यावर सुद्धा कामगारांना बाजूला व्हा, आता थोडं थांबा असं सांगावं लागत होतं, कोणी येउदे,जाऊदे काम कधीच थांबत नव्हतं. कारण प्रत्येकाला आपण रामाची सेवा करत असल्याचे समाधान वाटत होते.”