इंडोनेशियामध्ये सध्या एशियन गेम्सचे वारे वाहत आहे. आपल्या देशात ही स्पर्धा सुरु असल्याने येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. आशियायी स्पर्धांच्या निमित्ताने अनेक जण यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी झाले आहेत. इतकेच नाही तर येथील एका जोडप्याने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे नाव ‘एशियन गेम्स’ असे ठेवले आहे. पालेंबंग या शहरात स्पर्धेचे उद्घाटन होण्याच्या काही तास आधी या मुलीचा जन्म झाला आणि या जोडप्याने आपल्या मुलीला स्पर्धेच्या नावावरुन ऐतिहासिक नाव देण्याचे ठरवले. या जोडप्याला आधीची २ मुले असून ही या जोडप्याची तिसरी मुलगी आहे.
एशियन गेम्ससारखा इव्हेंट अनेकवर्षांनी एखाद्या देशात होतो. यावर्षी ते भाग्य आमच्या देशाला लाभल्याने आम्ही मुलीला तेच नाव देण्याचे ठरविल्याचे या बाळाचे वडिल योर्डानिया डेनी यांनी सांगितले. त्यातही पालेंबंगसारख्या शहरात ही स्पर्धा होणे ही आणखी दुर्मिळ गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. भविष्यात आपल्या या मुलीला खेळामध्ये रस असले तर तिला चांगला खेळाडू बनवणार असल्याचेही या जोडप्याने सांगितले. या चिमुकलीचे पहिले नाव अबिदा असून शेवटचे नाव एशियन गेम्स असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. भविष्यात जर अबिदाला हे नाव आपल्या नावापुढे लावणे आवडले नाही तर ते स्वातंत्र्य तिला असेल असेही ते म्हणाले. आधीही ऑलिम्पिक गेम्सच्या दरम्यान मूल झाल्यास त्या मुलाचे नाव ऑलिम्पिक ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे.