साधरण दिवाळीच्या काळात नेहमीच अवकाशातून टिपलेले भारताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून तर खोटे फोटो व्हायरल व्हायला अजिबातच वेळ लागत नाही. दिवाळीत लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली भारतभूमी अवकाशातून कशी बरी दिसत असेल? याची उत्सुकता प्रत्येक भारतीयांना असते, त्यामुळे दिवाळीच्या काळात व्हायरल होणारे कोणतेही फोटो हे भारताचेच आहे असं ग्राह्य धरून आपण ते फॉरवर्ड करतो आणि मग हे फोटो खोटे असल्याचं लक्षात आल्यावर आपण तोंडघशी पडतो.

Video : विश्वविक्रमासाठी कायपण! त्याने तोंडात पेटत्या मेणबत्त्या ठेवल्या

असा अनुभव भारतीयांना दरवर्षी येतो. काहीवर्षांपूर्वी नासाने दिवाळीच्या काळात भारताचे अवकाशातून छायाचित्र टिपले होते, याला सहा सात वर्षांचा काळ उलटला असेल, तेव्हाची तो फोटो दरवर्षी दिवाळीत व्हायरल होतो. पण सुदैवाने यावेळी अंतराळवीर पाओलो नेस्पोली यांनी भारताचा अवकाशातून टिपलेला फोटो शेअर केला आहे. दोन दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पाओलो यांनी शेअर केलेला फोटो पाहून भारतीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ‘दिव्यांच्या सणाला सुरुवात झाली आहे, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!’ असं लिहित त्यांनी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालेल्या भारताचा फोटो शेअर केला. त्यामुळे अनेकांनी पाओलो यांचे आभार मानले.