स्विगी या ऑनलाइन फूड डिलेव्हरी सेवेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्वात मोठ्या ऑर्डरबद्दलचा खुलासा कंपनीने केला आहे. २०२२ च्या ट्रेण्ड रिपोर्टमध्ये ‘स्विगी’ने काही विशेष आकडेवारी जाहीर केली आहे. बंगळुरु शहरामधून ‘स्विगी’वरुन भारतातील सर्वात महागडी आणि मोठी ऑर्डर देण्यात आल्याचं ‘स्विगी’च्या अहवालात म्हटलं आहे. ही ऑर्डर ७५ हजार ३७८ रुपयांची होती. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीमध्ये ही ऑर्डर देण्यात आली होती. विशेष म्हणजे सर्वात महागड्या ऑर्डरच्या यादीमध्ये भारतात दुसऱ्या स्थानी एक पुणेकर आहे. पुण्यातील या ग्राहकाने एकाचवेळी ७१ हजार २२९ रुपयांचे बर्गर आणि फ्राइज मागवल्या होत्या.

“आमचा सर्वात भुक्कड ग्राहक बंगळुरुमधील आहे. त्यांनी एकाच ऑर्डरमध्ये ७५ गहजार ३७८ रुपयांचे पदार्थ दिवाळीदरम्यान मागवले होते. यानंतर पुण्यामधील एका व्यक्तीने बर्गर आणि फ्राइजची ऑर्डर देत संपूर्ण टीमसाठी जेवण मागवलं होतं. यावेळेस बिल ७१ हजार २२९ रुपयांची होती,” असं ‘स्विगी’ने म्हटलं आहे.

‘स्विगी’च्या वन सर्व्हिस सेवेअंतर्गत सर्वाधिक पैसे वाचवण्यामध्ये बंगळुरुकर आघाडीवर आहेत. “स्विगी वनच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे बंगळुरु शहरातील लोकांनी वाचवलेत. बंगळुरुमधील लोकांनी ऑफर्सच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची बचत केली आहे. बंगळुरु खालोखाल मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांचा क्रमांक लागतो. दिल्लीतील एकाच व्यक्तीने ऑफर्सच्या माध्यमातून २.४८ लाख रुपयांची बचत केली,” असं ‘स्विगी’ने म्हटलं आहे. ‘स्विगी वन’ ही ‘स्विगी’ची विशेष सेवा असून यामध्ये मोफात डिलेव्हरी, विशेष ऑफर्स, खास किंमत अशा सुविधा ग्राहकांना मिळतात.

२०२२ मध्ये बिर्याणी ही सर्वाधिक मागवलेली डीश ठरली आहे. दर मिनिटाला १३७ प्लेट बिर्याणीच्या ऑर्डर ‘स्विगी’वर करण्यात आल्या. “२०२१ मध्ये ग्राहकांनी मिनिटाला ११५ बिर्याणी मागवल्या होत्या. हीच संख्या २०२२ मध्ये १३७ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एका सेकंदाला २.२८ बिर्याणी मागवण्यात आल्या,” असं या अहवालात ‘स्विगी’ने म्हटलं आहे. भारतीय खवय्ये परदेशी पदार्थ ज्यामध्ये इटालीयन पदार्थ असलेला राविओली आणि कोरियन पदार्थ असलेल्या बिबिम्बापचीही मोठ्या प्रमाणात ऑर्डर करु लागलेत.

मसाला डोसा हा सर्वाधिक मागवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर चिकन फ्राइड राईस हे तिसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक ऑर्डर करण्यात आलेला पदार्थ आहे. सामोसा हा या वर्षाही मागील वर्षाप्रमाणे सर्वाधिक ऑर्डर केलेला स्नॅक्समधील पदार्थ ठरला आहे.