सोशल मीडियावर सध्या एकाच इमोजीची जोरदार चर्चा आहे. काही लोकांनी या इमोजीचं जबरदस्त कौतुक केलंय, तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्ड इमोजी डे (१७ जुलै) निमित्त अॅपल कंपनीनं काही नवीन इमोजी लाँच केल्या होत्या. त्यात हिजाब इमोजीचाही समावेश आहे. एक इमोजी हिजाबमध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळंच या इमोजीची जोरदार चर्चा आहे. अॅपलनं लाँच केलेल्या या बहुचर्चित हिजाब इमोजीची कल्पना मात्र एका १६ वर्षांच्या मुलीची आहे. रऊफ अलहुमेदी असं या मुलीचं नाव आहे. स्वतःसाठी एक इमोजी असावा असं वाटलं. त्यामुळं हिजाब परिधान केलेल्या मुलीचा इमोजी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असं रऊफनं सांगितलं. रऊफ सध्या जर्मनीत राहते. ती मूळची सौदीची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी रऊफ आणि तिच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला होता. स्वतःच्या नावाची काहीतरी ओळख असावी असं या मित्रांना वाटलं. त्यांनी स्वतःची ओळख म्हणून एकेक इमोजी ठेवायचं असं ठरवलं. त्याचवेळी हिजाब परिधान केलेल्या रऊफला आपल्यासाठी काय इमोजी ठेवावं, असा प्रश्न पडला. हिजाब परिधान केलेली इमोजी असावी, अशी कल्पना तिला सुचली. त्यातून अॅपलनं लाँच केलेली ‘हिजाब इमोजी’ तयार झाली.

रऊफ सध्या व्हिएन्नामध्ये राहते. गेल्या वर्षी तिनं हिजाब परिधान केलेली इमोजी असावी, असा प्रस्ताव ‘यूनिकोड कॉन्सर्टियम’कडे पाठवला. त्यांनी या इमोजीबाबत विचार केल्यानंतर ती विकसित केली. अल्पावधीतच या इमोजीच्या प्रस्तावाला प्रसिद्धी मिळाली. यूनिकोड इमोजीच्या समितीनं हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर रेड्डीट या अमेरिकन वेबसाइटचे सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियन यांनी या इमोजीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यांनी ऑनलाइन चर्चा घडवून आणली. त्यावेळी रऊफनं हिजाब इमोजीमागील कल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. अनेकांनी तिच्या या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला. तर काहींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पण अॅपलनं हिजाब इमोजी लाँच केल्यानं रऊफ भलतीच खूश आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Berlin girl rayouf alhumedhi idea apples hijab emoji world emoji day
First published on: 22-07-2017 at 13:24 IST