Guinness World Records: जीवनात कधीकधी कठीण परिस्थिती उद्भवलेली असताना आशेची मंद ज्योत दिसून येते. अशीच काहीशी कहाणी आहे एका नवजात मुलाची. त्याला डॉक्टरांनी अपेक्षेपूर्वीच जगणं अशक्य घोषित केलं होतं. मात्र नशिबाने त्याच्यासाठी काही तरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. अमेरिकेतली आयोवा सिटीमध्ये जन्म झालेला चिमुकला नॅश सध्या जगभरात संदेश देत आहे की, चमत्कार कधीही, कोणत्याही प्रकारे घडू शकतात. फक्त २८३ ग्रॅम वजनाच्या या मुलाने जगातील वेळेआधी जन्मलेल्या बाळाचा किताब मिळवला आहे.
नेमकी ही घटना काय?
२०२४ मध्ये फक्त २१ आठवड्यांच्या गर्भधारणेदरम्यान जन्मलेल्या नॅशने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. इतक्या लवकर जन्माला आल्याने जगण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र नॅश सध्या अगदी निरोगी आयुष्य जगत आहे. नॅशचं वजन जन्माला येताच अगदी एखाद्या कपकेक पेक्षाही कमी होते. त्याचे स्मित, त्याचे गोड डोळे आणि त्याच्या नाजूक हालचाली हे सिद्ध करतात की जीवनाला कधीही कमी लेखू नये.
६ महिन्यांचा संघर्ष
एनआयसीयूमध्ये सहा महिन्यांचा नॅशचा संघर्ष सोपा नव्हता. नॅशचे आई-वडील मॉली आणि रँडल यांचा आधी एक गर्भपात झाला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे इशारा दिला होता की, बाळ जगण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि जरी जन्माला आले तरी अत्यंत गुंतागुंत असू शकते. तरीही मॉलीने आशा सोडली नाही. प्रसूती वेदना झाल्या आणि नॅशचा जन्म २१व्या आठवड्यातच झाला.
नॅश जन्माला आल्यानंतर सहा महिने त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. सहा महिन्यांनंतर अखेर तो पालकांच्या मिठीत आला. त्याचा चेहरा तेजस्वी होता. त्याला अजूनही ऑक्सिजन सपोर्ट आणि फीडिंग ट्यूबची आवश्यकता आहे. त्याच्या हृदयात एक लहानसा दोष आहे, मात्र तो वेळेनुसार दुरूस्त होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तो अजून रांगत नाही पण उपडी होतो. प्रत्येक संवादाला तो प्रतिसाद देतो.
