एक काळ असा होता जेव्हा चांगल्या पदार्थांची व्याख्या करताना डोळ्यासमोर पुरळपोळी, कोथिंबीरवडी, कटाची आमटी असे एकाहून एक खमंग पदार्थ यायचे. मात्र कालानुरुप या चांगल्या पदार्थांची व्याख्याही बदलली. पुरळपोळी, कोथिंबीर वडीची जागा आता पिझ्झा, बर्गर आणि फ्रॅंकी या सारख्या फास्टफूडने घेतली आहे. हे पदार्थ चवीला जरी चांगले असले तरी ते आरोग्यासाठी तेवढेच हानीकारक असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. मात्र हे सत्य जाणत असतानादेखील आताची तरुणाई आणि विशेषकरुन लहान मुलांमध्ये या पदार्थांची विशेष क्रेझ पाहायला मिळते. परंतु या पदार्थांचा अतिरेक झाल्यामुळे अनेक वेळा ते जीवावरही बेतात. असाच प्रकार फ्रान्समध्ये एका लहान मुलासोबत घडला आहे. निम्म दर्जाचं बर्गर खाल्यामुळे येथील लहान मुलाचा तब्बल आठ वर्षांनंतर मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये राहणाऱ्या नोलन मोइती या मुलाचा १४ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूमागे खरं कारण त्याने आठ वर्षांपूर्वी खालेलं बर्गर आहे. या प्रकरणी सध्या अधिक तपास सुरु असून नोलन ज्या हॉटेलमध्ये हे बर्गर खाल्लं होतं. त्या हॉटेल मालकाला तीन वर्षांची शिक्षा झाली आहे.

नोलनने २०११ मध्ये एका हॉटेलमध्ये बर्गर खाल्लं होतं. हे बर्गर निकृष्ट दर्जाच्या पदार्थांपासून तयार करण्यात आलं होतं. नोलनने खराब प्रतीचं बर्गर खाल्ल्यानंतर सलग आठ वर्ष त्याला मरणयातना भोगाव्या लागल्या. खराब बर्गर खाल्ल्यानंतर नोलनचे एक-एक करुन अवयव निकामी होऊ लागले. पहिले त्याला मानसिक आजाराला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्याला बोलता येणं अशक्य झालं. इतकंच नाही तर त्याला अर्धांगवायूचा झटकादेखील आला. यानंतर त्याच्या शरीराची अर्धी बाजू निकामी झाली आणि तो कायमस्वरुपी अंथरुणाला खिळला. या संपूर्ण प्रकारानंतर नोलनने जेथे हे बर्गर खाल्लं होतं त्या हॉटेल मालकावर कारवाई करण्यात आला आणि त्याला तीन वर्षांची शिक्षा झाली. परंतु या साऱ्यामध्ये आठ वर्ष रोज त्रास सहन करणाऱ्या नोलनचा मात्र अखेर मृत्यू झाला.

“एक खराब, निम्म दर्जाचं बर्गर खाल्ल्यामुळे नोलनचा मृत्यू झाला. या बर्गरमुळे त्याचा एकदा नाही तर आठ वर्ष दररोज मृत्यू होत होता. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांनीदेखील खूप त्रास सहन केला. डॉक्टर म्हणाले जर नोलन आज जीवंत असता तर त्याला किडनीशी संबंधित अनेक आजारांना सामोरं जावं लागलं असतं”, असं नोलनचे वकील फ्लॉरेन्स रॉल्ट यांनी सांगितलं.

दरम्यान, गाय लॅमलेट असं या हॉटेल मालकाचं नाव असून नोलन जेव्हा आजारी पडला तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. गाय लॅमलेट यांना पूर्वी या प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झाली असून आता नोलनचा मृत्यू झाल्यानंतर हा खटला पुन्हा एकदा सुरु झाला आहे.