लग्नात मानपान दिला नाही, हुंडा दिला नाही इथपासून ते रसगुल्ला दिला नाही, जेवणात मीठ कमी होते, मासांहार नव्हता या कारणांपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये लग्न मोडल्याच्या बातम्या आपण वाचत आलोय. इतकंच कशाला दोन एक आठवड्यापूर्वी नवऱ्याने भरमंडपात दारू पिऊन नागीण डान्स केला म्हणूनही लग्न मोडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. आता उत्तर प्रदेशमध्ये नवऱ्याने फोर व्हिलर मागितली म्हणून लग्नाच्या रात्री नवरीनं लग्न मोडल्याची घटना घडली आहे. अनेकदा लग्नात मुलींच्या कुटुंबियांकडे नवऱ्यामुलाकडून हुंड्याची मागणी केली जाते. या नवऱ्यामुलाकडून देखील फोर व्हिलरची मागणी केली जात होती. जर लग्नात गाडी मिळाली नाही तर लग्न मोडू अशा धमक्या तिच्या कुटुंबियांना येत होत्या. शेवटी हे प्रकरण एवढं ताणलं की गाडीची मागणी करणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबियांना मुलीकडच्यांनी हॉलमध्येच बंद करून ठेवलं. बरेच वादाविवाद झाल्यानंतर वधुपक्षाने त्यांची सुटका केली. प्रत्यक्ष बोलून या समस्येवर काही तोडगा निघतो का, असा प्रयत्न दोन्ही कुटुंब करत होते पण शेवटी लग्नाच्या रात्रीच लग्न मोडण्याचा निर्णय घेत नवरीमुलगी आपल्या घरी कायमची परतली.
वाचा : नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीनं लग्नच मोडलं
गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये मोदींवरुन चक्क एका जोडप्याने लग्न मोडलं होतं. इथे राहणाऱ्या व्यावसायिकाचे महिला सरकारी कर्मचाऱ्यासोबत लग्न ठरले होते. या वेळी मोदींचा विषय निघाला तेव्हा देशाचा आर्थिक विकास मंदावला असून, यासाठी मोदीच जबाबदार असल्याचे त्या महिला कर्मचाऱ्याचे म्हणणे होते. तर व्यावसायिक हा कट्टर मोदी समर्थक असल्याने त्याला आपल्या भावी पत्नीचे मत पटले नाही. मोदींवरुन त्या दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.