चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने विक्रमच्या लँडिंगच्या जागेचा फोटो पाठवलेला असला तरी इस्रोच्या वैज्ञानिकांना त्यावरुन अद्याप ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. आता अमेरिकेची प्रसिद्ध अवकाश संस्था नासा विक्रमला शोधून त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मागच्या आठवडयात लँडिंगच्या अखेरच्या टप्याप्यात विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. इस्रोकडून संपर्क साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. नासाच्या जेपीएल प्रयोगशाळेच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. नासा या ऑर्बिटरच्या सहाय्याने विक्रमच्या लँडिंगच्या जागेचे फोटो काढणार आहे. सध्या चंद्राच्या ज्या भागावर विक्रम आहे तिथून १७ सप्टेंबरला नासाचा ऑर्बिटर जाणार आहे. त्यावेळी ऑर्बिटरमधून काढण्यात येणारे फोटो इस्रोकडे सोपवण्यात येतील. त्यावेळी विक्रमची नेमकी स्थिती काय आहे ते समजू शकेल. न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी इस्रोकडे फक्त २१ सप्टेंबरपर्यंतचा वेळ कारण त्यानंतर चंद्रावर रात्र सुरु होईल. रात्रीच्यावेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. त्या वातावरणात लँडर, रोव्हर काम करण्याची शक्यता नाही. पृथ्वीरचे चौदा दिवस म्हणजे चंद्रावरचा एक दिवस असतो. त्यामुळे लँडर, रोव्हरची रचना १४ दिवस काम करण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. ऑर्बिटरशिवाय नासा त्यांच्या डीप स्पेस नेटवर्क सेंटरच्या मदतीने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

इस्रो ब्यालालु येथील ३२ मीटर अँटेनाचा वापर करुन विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्यालालु हे बंगळुरु जवळ असलेले इस्रोचे डीप स्पेस नेटवर्क सेंटर आहे. आतापर्यंत केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. जेपीएलच्या ७० मीटर अँटेनाच्या सहाय्याने सुद्धा विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेपीएल ही नासाशी संबंधित असलेली प्रयोगशाळा आहे. पण विक्रमकडून अजून कुठलाही सिग्नल मिळालेला नाही.आमचा जेपीएल बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे. विक्रम बरोबर संपर्क साधण्यासाठी आम्ही त्याचा पुरेपूर वापर करत आहोत असे इस्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितले. इस्रोच्या नियंत्रण कक्षातून विक्रमला कमांड दिल्या जात आहेत. पण विक्रमकडून अजून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 nasa moon orbiter vikram lander isro dmp
First published on: 13-09-2019 at 12:22 IST