पहिल्या प्रयत्नात चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये यश मिळाले नसले तरी भविष्यात पुन्हा एकदा चंद्रावर लँडिंगचा प्रयत्न करण्यात येईल असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे. ते दिल्लीमध्ये बोलत होते. आम्ही सुद्धा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो हे दाखवून देण्यासाठी इस्त्रो कटिबद्ध आहे. त्यासाठीच्या योजनेवर काम सुरु आहे अशी माहिती सिवन यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात सप्टेंबरला चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरच्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगमध्ये इस्रोला यश मिळाले नव्हते. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या काही मिनिट आधी विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संर्पक तुटला होता. चंद्रावर विक्रम लँडरचे नेमके काय झाले ते अजून स्पष्ट झालेले नाही. विक्रम लँडरच्या लँडिंगसंबंधीचा महत्वाचा डाटा अवकाश संस्थेकडे उपलब्ध आहे.

लँडिंग संदर्भात सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणण्यासाठी अमूल्य माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. नजीक भविष्यात इस्रो अनुभव, ज्ञान आणि टेक्निकल क्षमतेद्वारे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करु शकतो हा दाखवून देईल असे सिवन म्हणाले. सूर्याच्या दिशेने यान पाठवण्यासह मानवी अवकाश मोहिमेची तयारी व्यवस्थित सुरु आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये उपग्रह प्रेक्षपणाच्या मोहिमांची योजना आहे असे सिवन यांनी सांगितले.

नासाचा ऑर्बिटर पुन्हा चंद्रावर ‘विक्रम लँडर’ला शोधण्यात अपयशी
नासाच्या ऑर्बिटरला दुसऱ्या प्रयत्नातही विक्रम लँडरला शोधून काढता आलेले नाही. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर १४ ऑक्टोंबरला विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला. नासाच्या एलआरओने लँडिंग साइटच्या जागेचे वेगवेगळे फोटो काढले. पण त्यानंतरही विक्रम लँडरचा शोध लागू शकलेला नाही. ७ सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते.

विक्रम लँडर सावल्यांखाली झाकला गेल्यामुळे त्याचे स्पष्ट फोटो मिळत नसावेत असे नासाचे म्हणणे आहे. यापूर्वी १७ सप्टेंबरला एलआरओ ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेला होता. १७ सप्टेंबरला संधी प्रकाशाची वेळ असल्याने विक्रमच्या लँडिंग साइटचे स्पष्ट फोटो मिळू शकले नव्हते. त्यामुळे १४ ऑक्टोंबरला अपेक्षा होती. पण यावेळी सुद्धा ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत. १७ सप्टेंबरला चंद्रावर अंधार पडण्याची वेळ असल्याने सावलीमुळे विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 will attempt another moon landing isro chief k sivan dmp
First published on: 02-11-2019 at 15:34 IST