Lizard Farming Shocking Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे फार धक्कादायक असतात. अलीकडे असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही घाम फुटेल. कारण- त्या व्हिडीओतील दृश्यंच तशी आहेत. भारतात घरांमध्ये पाल आढळली, तर ते सामान्यत: अपशकुनाचं किंवा संकटाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे भिंतीवर पाल फिरताना दिसली तरी तिला घाबरून हाकलून लावलं जातं. त्यामुळे भारतात तरी पालींची शेती दूरच; पण पाळण्याचाही कोण विचार करणार नाही. पण, या व्हिडीओत एका महिलेनं चक्क घरात हजारो पालींची शेती केलीय.

एकाच ठिकाणी जमलीय शेकडो पालींची मैफील

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका खोलीत एक महिला उभी असून, ती भिंतीजवळ लटकवलेली चादर वर करून दाखवते. यावेळी चादरीच्या मागे एकाच वेळी शेकडो पाली रेंगाळताना दिसतायत. जणू एकाच ठिकाणी अक्षरश: शेकडो पालींची मैफील जमलीय. चादर वर करताच अनेक पाली पळण्याचा प्रयत्न करतायत; तर काही खाली पडतात. धडकी भरवणारी गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या अंगाखांद्यावरही पाली फिरताना दिसतायत. पण, तरीही ती बिनधास्तपणे तिथे उभी आहे. संपूर्ण खोलीत पालींचा मुक्त संचार आहे. खास पालींसाठी तिने खोलीत एक वेगळे वातावरण तयार केले आहे. जिथे ती पालींची काळजी घेते, त्यांना खायला प्यायला देते. हे दृश्य खरेच एका चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटते.

कुठे केली जाते पालींची शेती?

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कोणत्या देशात अशी पालींची शेती केली जाते. तर, आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की, चीनमध्ये पालींची शेती केली जाते. चीनमध्ये गेको आणि मॉनिटर लिझार्डसारख्या पालींची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामागचे कारण म्हणजे पालींचे हे प्रकार चीनमध्ये औषधी मानले जातात. या पालींचा वापर रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आणि दाहकविरोधी औषधांमध्ये केला जातो.

त्याशिवाय काही लोक त्यांना विदेशी पाळीव प्राणी म्हणूनदेखील पाळतात. चीनमध्ये या प्रकारची शेती एक फायदेशीर व्यवसाय ठरला आहे, जिथे शेतकरी पालींना वाढवतात आणि बाजारात विकतात.

पालींच्या शेतीचा हा व्हिडीओ @Babaxwale नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. चीनमध्ये ही एक सामान्य गोष्ट असली तरी भारतात पालींना सामान्यतः भयानक आणि अशुभ मानले जाते.

सोशल मीडियावरील भारतीय युजर्सनी या व्हिडीओवर विविध कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “पाली पाळण्याची हिंमत! भारतात पाल दिसताच लोक मारण्यासाठी सरळ चप्पल उचलतात.” दुसऱ्याने विनोदाने लिहिले, “जर भारतात अशी शेती सुरू झाली, तर चप्पलची विक्री वाढेल.”