परीक्षेदरम्यान कॉपी करणारे बहाद्दर जगभरात सगळ्याच ठिकाणी असतात. त्यांना पकडण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. मात्र हे विद्यार्थी कॉपी करण्यात माहीर असल्याने ते यातूनही पळवाटा काढतात. सध्या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असल्याने त्याचा वापर या गोष्टीसाठीही केला जात आहे.

चीनमध्ये परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अशाच प्रकारची अत्याधुनिक पद्धत वापरण्यात आली आहे. पद्धत पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चीनमधील शिक्षणाधिकाऱ्यांनी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर केला आहे. विद्यार्थ्यांचे चेहरे तपासत त्यांच्या चेहऱ्यावरुन कॉपी बहाद्दरांना शोधून काढण्याचा घाट या शिक्षणाधिकाऱ्यांनी घातला आहे. ही पद्धत वापरुन हजारो माध्यमिक विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मागील अनेक वर्षांपासून चीनमध्ये कॉपीसाठी वायरलेस पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांकडून होताना दिसतो. यासाठी ते खोडरबर, बेल्ट, घड्याळ यांचा वापर करतात. याशिवाय कानात घालण्याच्या काही लहान उपकरणांचाही वापर कॉपीसाठी कऱण्यात येतो. हे उपकरण वापरुन परीक्षा खोलीच्या बाहेर असणाऱ्यांकडून मदत घेण्यात येते. असे सगळे प्रकार ओळखण्यासाठी ड्रोनचा वापर कऱणार असल्याचे येथील शिक्षण व्यवस्थेकडून सांगण्यात आले आहे.

सामोसा विकण्यासाठी त्याने गुगल कंपनीला ठोकला रामराम!

या ड्रोनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती, चेहऱ्याची आणि हाताच्या ठशांची स्थिती ओळखता येणार आहे. याशिवाय मोबाईल ब्लॉक करण्यासाठीची सुविधाही या ड्रोनमध्ये असणार आहे. ही पद्धत वापरुन आतापर्यंत ५२ जणांना परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना ७ वर्षांचा कारावास भोगावा लागणार असल्याचेही येथील स्थानिक माध्यमांकडून सांगण्यात आले आहे.

गणित आणि इंग्रजी विषयासारख्या बहुपर्यायी परीक्षेसाठी जास्त प्रमाणात कॉपी कऱण्यात येते. अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांवर आता शिक्षण मंडळाची करडी नजर राहणार असून कॉपीला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध होण्याची शक्यता आहे.