प्रेमासाठी ‘चाँद तारे तोडण्याचा’ जमाना गेला. आता काळ आहे हटके वेडिंग्ज् चा. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ किंवा ‘थीम वेडिंग’ हे शब्दसुध्दा आता आपल्या सगळ्यांना फारसा अनोळखी राहिलेला नाही. आता कुठला हाॅल बुक करायचा यावर ‘टेन्स’होण्याचे दिवस मागे राहिलेत. आता सगळ्या वऱ्हाडाला उचलून राजस्थानला वगैरे नेत राजेशाही थाटात लग्नसमारंभ करायचे दिवस आहेत.

थोडक्यात काय, यंगस्टर्स टिपिकल लग्नांना फाटा देत काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. पण यामध्येही समुद्राखाली लग्न करणं म्हणजे डोक्यावर पाणीच ! (वाईट होता)

पण महाराष्ट्राच्या निखिल पवारने हे पण केलंय. निखिल केरळमधल्या कोवालम मध्ये डायव्हर म्हणून काम करतो (ड्रायव्हर नाही). आपल्या कामाच्या निमित्ताने त्याची स्लोवाकियाच्या युनिका पोग्रॅमशी भेट झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला.

वाचा -अवघ्या काही फुटांवर होता मृत्यू

पण या हट के कपलने आपलं लग्नसुध्दा ‘हट के’ करायचं ठरवलं आणि समुद्राखाली लग्नसोहळा केला. या जोडप्याच्या लग्नासाठी मग कोवालम बीचजवळच्या समुद्राखाली एक विशेष पोडियम तयार केलं गेलं. समुद्राखाली ‘सात फेरे’ शक्य नसल्याने ख्रिश्चन पध्दतीने लग्न करायचं ठरलं. निखिल-युनिकाच्या विवाहासाठी मग माहौल सज्ज झाला.

दोघंही स्कूबा डायव्हिंगचा पोशाख घालत समुद्राखाली खास तयार केलेल्या पोडियमवर एकमेकांच्या बोटात अंगठी घालत विवाहबंधनात अडकले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचे मित्रमैत्रिणीही त्यांच्या या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याला आवर्जून हजर राहिले. आपले भारी ड्रेस मिरवण्याचा काहीच चान्स नसताना या पाहुण्यांनीही स्कूबा डायव्हिंगच्या पोशाख घालत निखिल आणि युनिकाला शुभेच्छा दिल्या.केरळमध्ये आपला लग्नसोहळा करणाऱ्या या जोडप्याने आपल्या लग्नाची नोंदणी महाराष्ट्रात करण्याचं ठरवलंय.

ठरलेल्या पध्दतींना फाटा देत वेगळ्या पध्दतीने झालेला हा सोहळा नेटवर चर्चेचा विषय ठरलाय.