अॅमेझॉनचं जंगल हे जैवविविधतेनं संपन्न असं जंगल मानलं जातं. या जंगलात अजस्त्र अशा हॅम्पबॅक व्हेलचा मृतदेह आढळून आला आहे. या वर्षांवनात व्हेल आढळणं तसं दुरापास्तच. मात्र अॅमेझॉन नदीच्या मुखाशी वसलेल्या मारोजो बेटावरील खारफुटींच्या वनांत हा मृतदेह आढळला आहे. जवळपास दहा टन वजनाचा व्हेलचा मृतदेह जंगलाच्या मध्यभागी आला कसा या विचारात इथले स्थानिक होते. अखेर यामागचं रहस्य उलगडलं आहे.

ओशनोग्राफर मॉरा सॉरा हिनं याचा शोध लावला आहे. दक्षिण अटलांटिकमध्ये आढळणाऱ्या व्हेल या साधरण वीणीच्या हंगामात ब्राझीलच्या दिशेनं येतात. मात्र ही उत्तर अटलांटिकमध्ये आढळणारी व्हेल असू शकते . हे व्हेलचं पिल्लू असून साधरण १ ते दीड वर्षांचं ते असावं असा अंदाज तिनं बांधला आहे. पाच सहा दिवसांपूर्वी या व्हेलचा मृत्यू झाला असावा असंही तिनं म्हटलं आहे. त्यानंतर तिचा मृतदेह वाहत इथे आल्याचं तिनं सांगितलं.

या हंगामात खारफुटींच्या जंगलात साधरण १३ ते १४ फुट उंच भरतीचं पाणी येतं. भरतीमुळे अनेकदा मलबा खारफुटींच्या जंगलात वाहून येतो. यात कधी कधी मोठमोठ्या जहाजांचे तुकडे आणि इतर कचराही असतो. भरतीमुळे हा मृतदेह खारफुटीच्या जंगलात आला अशी शक्यता तिनं वर्तवली आहे.