मंडळी ही बातमी तुमच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. जर तुम्ही एखाद्या ब्रँडवर विश्वास ठेऊन खाद्यपदार्थ खात असाल तर सावधान… कारण तुम्हाला मिळत असलेले खाद्यपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतलीच जात असेल असं नाही. गेल्या काही दिवसांपासून खाद्यपदार्थांमध्ये पाल सापडण्याच्या घटना घडल्या तर आता चक्क पॅकबंद पाकिटात मेलेली पाल सापडलीय. तामिळनाडूमध्ये एका स्नॅक्सच्या पॅकेटात मेलेली पाल सापडल्याची घटना घडलीय. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना २३ ऑक्टोबरची आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुनेलवेली जिल्ह्यातील पलायमकोट्टई शहरातील एका मिठाईच्या दुकानातून एका व्यक्तीने स्नॅक्सचे पॅकेट विकत घेतलं होतं. यात फराळासह तळलेली पाल दिसून आली. त्या व्यक्तीने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे (FSSAI) तक्रार केली आहे. फूड पॅकेटमध्ये मृत पालीचा फोटो सध्या सोशल चर्चेत विषय बनलाय. या सगळ्या प्रकारातूनच लक्षात येतं की कशा पद्धतीने आपल्या आरोग्याशी खेळ होत आहे. त्यामुळे खवय्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी शशी दीपा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित दुकानाला भेट दिली. बंद डब्यात मिठाई आणि फराळ व्यवस्थित न ठेवण्यासारख्या अनेक नियमांचे उल्लंघन या दुकानात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय. कालबाह्य झालेले खाद्यपदार्थ, विविध मिठाई आणि गुलाब जामुन यांसारखे स्नॅक्स आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी अनेक खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

indianexpress.com शी बोलताना शशी दीपा यांनी सांगितलं की, “२३ ऑक्टोबर रोजी त्यांना व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार आली होती. स्नॅक्सचे पॅकेट उघडताच एक मेलेली पाल दिसल्याची तक्रार होती. आमच्याकडे पॅकेट नाही, आम्ही फक्त फोटो बघून दुकान तपासायला आलो. फोटोमध्ये दिसणारा स्नॅक्सचा प्रकारचा या दुकानात मिळाला नाही, मात्र एफएसएसएआयच्या मानांकानुसार इथे अनेक नियम मोडले जात असल्याचं दिसून आलं. सध्या दुकान पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेलेली पाल सापडल्याच्या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास सुरू आहे.”

दुसरीकडे, तिरुनेलवेली जिल्हा पोलीस आयुक्त एनके सेंथामराइकन्नन यांनी सांगितलं की, दुकान मालकाच्या तक्रारीनुसार एका व्यक्तीने त्याच्यावर मृत पाल सापडल्याची खोटी तक्रार करून त्याच्याकडून २० लाख रुपयांची मागणी केली आहे. स्नॅक्समध्ये मेलेली पाल सापडल्याची तक्रार पूर्णपणे खोटी आहे, असं दुकान मालकाचं म्हणणं आहे.