आजच्या घडीला स्मार्टफोनच्या वापरातून प्रत्येकजण स्मार्ट झालाय म्हणायला हरकत नाही. सर्रास सर्वांना स्मार्टफोनने वेड लावल्याचे दिसते. आता स्मार्टफोन असल्यावर फोटोचे वेड नसणारे दुर्मिळच म्हणावे लागेल. मग त्यातून निर्माण झालेली सेल्फीची क्रेझही मोठ्या प्रमाणात दिसून येते. सेल्फीच्या वेडापायी जीवावर उधार होणाऱ्या मंडळींनाही आपण यापूर्वी पाहिले असेल. अशा घटना समोर आल्यानंतरही सेल्फीचे वारे हे कमी होताना दिसले नाही. स्वत:चे फोटो काढून ते सोशल माध्यमांवर शेअर करण्याची क्रेझ प्रसिद्ध कलाकारांपासून ते सामान्य स्मार्टफोन वापरकर्त्यात सर्वांमध्ये कमालीची असल्याचे दिसून येते. सेल्फी घेण्याचा प्रकार काहींना विचित्र वाटत असला तरी बहुतांश लोकांना याचा भलताच लळा लागला आहे.

सेल्फी हे व्यसन बनले असे मानले तर एका वेळी एखादा व्यक्ती स्वत:चे किती फोटो काढू शकतो, याची तुम्ही कल्पना केली आहे का? जरी केली असली तरी सर्वात कमी वेळात अधिक सेल्फी काढण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की केला नसेल. याच कारण सर्वाधिक कमी वेळात अधिक सेल्फी काढण्याचा व्यक्तीचा चेहरा सध्या समोर आला आहे. एका व्यक्तीने अवघ्या तीन मिनिटात १२२ सेल्फी काढण्याचा नवा विक्रम केला आहे. डोनी वाहलबर्गच्या या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. सर्वाधिक कमी वेळात त्याने सेल्फीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मॅक्सिकोतील कोजेमूलमध्ये डोनी वाहलबर्गने हा नवा इतिहास रचला. यापूर्वी सिंगापूरमधील एका व्यक्तीने ३ मिनिटात ११९ सेल्फी काढण्याचा विक्रम नोंदविला होता.

अर्थातच सेल्फीचे वेड हे तुम्हाला गिनिज बुकात आपला चेहरा झळकविण्याची संधी उपलब्ध करुन देऊ शकते. हे वाहलबर्गने  दाखवून दिले आहे. सेल्फीच्या माध्यमातून गिनीज बुकमध्ये आपला चेहरा झळकण्यासाठी जीवावर स्टंटबाजी करत फोटो काढण्याची गरज नाही तर फक्त अधिक कमी वेळात म्हणजे तीन मिनिटात १२२ पेक्षा अधिक सेल्फी काढण्याचा सराव करावा लागेल.