वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांची भष्ट्राचाराविरुद्ध सुरू केलेली मोहीम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. देशात अवैधरित्या आणण्यात आलेल्या गाड्यांचा त्यांनी अक्षरश: चुराडा करण्याचा आदेश दिला आहे. अशा प्रकारे गाड्या बुलडोजरखाली चिरडून टाकल्या की पुन्हा देशात अवैधरित्या गाड्या आणल्या जाणार नाही असा विश्वास रॉड्रिगो यांना आहे. म्हणूनच त्यांनी अशाप्रकारची कारवाई केली आहे.

कोट्यवधी किंमतीच्या मर्सडिज्, ऑडी, पोर्श अशा आलिशान गाड्या आणि तेवढ्याच किंमतीची दुचाकी वाहनं त्यांनी बुलडोजर खाली चिडरडून टाकण्याचा आदेश दिला. हा सारा खेळ त्यांच्या डोळ्यांदेखत रंगला होता. तस्करांच्या गटानं आणलेल्या तब्बल ७६ आलिशान गाड्या चक्काचूर झाल्या. अशा प्रकराच्या ८०० हून अधिक वस्तू अवैधरित्या देशात आणल्या गेल्या त्यांचीही अशाच प्रकारे ‘विल्हेवाट’ लावण्यात येईल असंही ते म्हणाले.  याआधी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी अवैधरित्या आणल्या गेलेल्या ३० हून अधिक गाड्या बुलडोजरखाली चिरडण्याचा आदेश दिला होता.