कळमेश्वर तालुक्यातील गौंडखैरीजवळील वेणा जलाशयात नाव उलटून नागपूरच्या आठ तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी केलेले फेसबुक लाईव्ह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आठही मित्रांना नौकाविहार करताना सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला होता आणि याच मोहापायी या आठही जणांचा जीव गेला. हे आठही जण होडीत बसून फेसबुक लाईव्ह करत होते. त्यांचे अनेक मित्र त्यांची ही मज्जा मस्ती पाहात होते, नौकाविहाराच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होत, पण हा आनंद काही मिनिटंही टिकाला नाही, काळाने घाला घातला आणि त्याची होडी पाण्यात उलटली. यात आठही जणांचा मृत्यू झाला. रविवारी सांयकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

वाचा : पूर परिस्थितीतही ‘तो’ जवान आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ

नागपूरचे आठ तरुण वेणा जलाशय परिसरात सहलीसाठी गेले होते. या जलाशयात तिघेही मासेमारी करत होते. त्यांना पाहून या सर्वाची नौकाविहार करण्याची इच्छा झाली. त्यांनी मासेमारी करणाऱ्यांना होडीत बसून जलाशयात फेरफटका मारण्याची विनंती केली. त्यानुसार नावेत तीन मासेमार आणि आठ तरुण असे एकूण अकरा जण बसले. नाव जलाशयाच्या मध्यभागी खोल पाण्यात गेल्यावर तरुणांना फेसबुक लाईव्ह करण्याचा आणि सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला. पण या गडबडीत छोटीशी होडी अनियंत्रित होऊन उलटली आणि नावेत असणाऱ्या आठ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या फेसबुक लाईव्हची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरूणांसारखी चूक इतर कोणी करू नये असे आवाहन केले जात आहे.

वाचा : दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवतीच्या वर्णभेदी वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका