अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले जात आहे. मात्र त्याचवेळी सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हा पराभव मंजूर करण्यास तयार असल्याचे चित्र दिसत नाहीय. ट्रम्प यांनी अनेक राज्यांमधील मतदानामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या विरोधात सर्वोच्च न्यायालयानमध्ये जाण्याचीही तयारी त्यांनी केली. मात्र ट्रम्प यांचा पराभव झाला असून न्यायलयात जाऊनही काही फायदा होणार नसल्याचे व्हाइट हाऊसमधील कायदेतज्ज्ञांनी राष्ट्राध्यक्षांना कळवल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलं आहे. असं असतानाच आता जगप्रिसद्ध टाइम मॅगझिनने ट्रम्प यांचा पराभव झाल्याने  मुखपृष्ठावरावरुन ट्रम्प यांना टोला लगावल्याचे सांगत एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

टाइम मॅगझिन हे जगभरामध्ये त्यांच्या मुखपृष्ठांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर टाइमने ‘टाइम टू गो’ असा मजकूर असणारा ट्रम्प यांचा दरवाजातून बाहेर जाणारा फोटो पहिल्या पानावर छापल्याची चर्चा सध्या सोशल नेटवर्किंगवर आहे. हा फोटो ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर छापण्यात आला असून हा टाइमचा आताचा अंक असल्याचा दावा सोशल नेटवर्किंगवर केला जात आहे. ट्विटरबरोबरच फेसबुकवरही या फोटोची चांगलीच चर्चा आहे.

मात्र व्हायरल झालेला हा टाइमचे हे कव्हरपेज खोटं असल्याचं उघड झालं आहे. टाइमने यंदा मुखपृष्ठावर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा फोटो छापला आहे. टाइमनेच आपल्या नव्या अंकाचे मुखपृष्ठ ट्विटरवरुन शेअर केलं आहे.

ट्रम्प यांचा हा कव्हरफोटो यापूर्वीही मे महिन्यामध्ये व्हायरल झाला होता. मात्र त्यावेळीही टाइमने अशापद्धतीचा कोणताच कव्हरफोटो केला नसल्याचे स्पष्ट झालं होतं. मे महिन्यामध्ये टाइमच्या अंकाचा कव्हरफोटो हा करोनाच्या साथीच्या काळामधील पिढी या विषयावर आधारित होता.