Father Son Emotional Video : आई-वडील नेहमी आपल्या मुलांना सांगत असतात की, आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी, आनंदी राहिले पाहिजे; कारण बऱ्याच लोकांना तेही मिळत नाही. पण, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांच्याकडे लहानाचे मोठे होईपर्यंत हट्ट करत राहतो. पण, प्रत्येक आई-बापाला मुलांचे असे हट्ट पुरवता येत नाही. आपण थकून भागून जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्यासाठी आई घरी जेवण तयार करून ठेवते, फ्रिजमध्ये ताजी फळं-भाज्या आणून ठेवलेल्या असतात, आपण दोन वेळचं चांगलं जेवण खाऊ शकतो. आनंदाचं जीवन जगू शकतो, पण अनेकांच्या वाटेला असं जीवन येत नाही, त्यांना अगदी लहान लहान गोष्टींसाठीही रोजचा संघर्ष करावा लागतो. यात बाप-लेकाचा असाच संघर्षमय जीवन दाखवणारा एक अतिशय ह्रदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
या भावनिक व्हिडीओत कुटुंबाचं पोट भरण्यासाठी बाप-लेकाला काय करावं लागतयं हे पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल. हे बाप-लेक चक्क रात्रभर कचरापेटीजवळ बसून राहतात. यानंतर तिथे कचरा टाकण्यासाठी भाजी विक्रेते येताच ते असं काही करतात की पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. गरिबी माणसाला काय काय करायला भाग पाडू शकते, याचे जिवंत उदाहरण या बाप लेकाच्या कृतीतून दिसतेय.
व्हिडीओत पाहू शकता की, एक बाप आणि त्याचा छोटा लेक रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या कडेला बसून आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा, गरिबी स्पष्टपणे दिसतेय. यावेळी ते कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत आहेत असे दिसतेय. याचवेळी अचानक तिथे एक भाजी विक्रेता आपली गाडी घेऊन येतो, ज्याला पाहून हे बाप लेक आनंदाने रस्त्यावरून उठून उभे राहतात. भाजी विक्रेता त्याच्याकडील कुजलेल्या भाज्या तिथे फेकतो आणि निघून जातो. याच रस्त्यावर फेकलेल्या भाज्या पाहून बाप-लेक खूश होतात. यावेळी बाप कचऱ्यातून एक एक करून त्यातील चांगल्या भाज्या निवडतो आणि आपल्या सायकलवरील गोणीत भरतो.
अशाप्रकारे रोज कोणीतरी विक्रेता येईल आणि कुजलेल्या भाज्या फेकून जाईल, यानंतर त्यातील चांगल्या भाज्या आम्ही घरी घेऊन जाऊ आणि कुटुंबाचं पोट भरू, या आशेने बाप-लेक रोज रस्त्याच्या कडेला बसून असतात.
या बाप-लेकाची कुटुंबाच्या पोटासाठी सुरू असलेली धडपड पाहून कळते की, आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला दोन वेळचं जेवण मिळतयं. पण, अशी अनेक गरीब कुटुंब आहेत, ज्यांना पोट भरण्यासाठी रोजचा संघर्ष करावा लागतोय.
बाप-लेकाचा हा अतिशय भावनिक ह्रदयस्पर्शी व्हिडीओ @frames_n_fork नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘तो मुलगाही त्याच्या वडिलांसह अन्नाच्या शोधात बाहेर पडला आहे.’ दुसऱ्या युजरने म्हटले की, ‘हे पाहिल्यानंतर असे वाटते की, आपण खरोखर भाग्यवान आहोत.’ तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘एखाद्याचा कचरा दुसऱ्यासाठी खजिना असू शकतो.’