Funny Viral Video : गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते. अनेकदा जेवायला मिळालं नाही तर भीक मागून खाण्याची वेळ येते. घर नसल्याने रस्त्यावर मिळेल ते अंगावर घेऊन झोपावे लागते. काहीवेळा काहीच मिळाले नाही तर थंडीत कुडकुडत झोपण्याचीदेखील वेळ येते. सध्या अशाच एका गरीब व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची दया नाही तर पोट धरून हसायला येईल. यामागचे कारणही तसेच आहे, एक गरीब व्यक्ती अंगावर पांढऱ्या रंगाची गोणी पांघरून रस्त्यावर झोपली होती. यावेळी लोकांनी चक्क कॉल करून पोलिसांना बोलावले. पण, पोलिस येताच असे काही घडले की पाहून उपस्थितही जोरजोरात हसू लागले.

नेमकं घडलं काय?

घडलं असं की, एक गरीब व्यक्ती अंगावर पांढऱ्या रंगाची गोणी पांघरून प्रेतासारखी झोपली होती. त्याला रस्त्यावर अशा स्थितीत झोपलेले पाहून लोकांना वाटले की, कोणीचं तरी हे प्रेत आहे. यावेळी त्यांनी पोलिस आणि रुग्णवाहिका बोलावली, पण जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा लोक हैराण झाले.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक पांढऱ्या रंगाची गोणी अंगावर पांघरून एक व्यक्ती झोपली आहे. दूरून पाहताना कोणालाही तो एक मृतदेह आहे असे वाटेल. तिथून जाणाऱ्या लोकांनाही असेच वाटले. त्यानंतर काही वेळातच तिथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली. लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसही आले आणि रुग्णवाहिकाही बोलावण्यात आली.

लोकांच्या जमलेल्या गर्दीमुळे तिथे खूप आवाज वाढला होता. लोक आपापसात याबाबत चर्चा करत उभे होते. याचवेळी अचानक ती व्यक्ती उठली आणि उठल्यानंतर ती गोणी घेऊन तिथून निघून गेली, जणू तिथे काही घडलेच नाही असा त्याचा भाव होता. हे दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि काही जण तर जोरजोरात हसायलाही लागले. त्या व्यक्तीला ही गर्दी, पोलिस इथे कशासाठी आलेत याबाबत काही म्हणजे काहीच ठाऊक नव्हते, तो सरळ उठला आणि तिथून निघून गेला.

“तुम्ही मला नीट झोपूही देत नाही”

हा मजेशीर व्हिडीओ एक्सवर @askshivanisahu या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काय हुशार लोक आहेत ते. लोक जमले, पोलिसही आले, सर्वांना वाटू लागले की, कोणीतरी मृतदेह फेकला आहे. पोलिसही त्यांच्या कामात व्यस्त झाले. त्यांनी रुग्णवाहिकाही बोलावली. आवाज वाढू लागल्यावर तो माणूस उठला आणि म्हणाला की, तुम्ही लोक आम्हाला नीट झोपूही देत नाही, सांगा चूक कोणाची आहे?’

हा हास्यास्पद व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘म्हणूनच असे म्हटले जाते की, आधी योग्यरित्या तपास करावा. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास प्रथम दगड फेकून प्रयत्न करा’, तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘डासांपासून स्वतःला वाचवण्यासाठी तो गरीब माणूस गोणी अंगावर घेऊन झोपला.’ त्याच वेळी काही जण हा जुना व्हिडीओ असल्याचे म्हणत आहेत.