Shantanu Naidu On Google Gemini Nano AI Saree Trend : सध्या गुगल जेमिनीचा ‘नॅनो बनाना’ 3D फिगरिनचा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टावर अनेकांनी आपले रेट्रो लूकमधील फोटो शेअर केल्याचं दिसून येत आहे. हे फोटो गुगल नॅनो बनाना ट्रेंड अंतर्गत तयार करण्यात आले आहेत. खरं तर या ट्रेंडला ‘घिब्ली’ ट्रेंडपेक्षा देखील जास्त मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘नॅनो बनाना’ची क्रेझ ही गुगलच्या जेमिनी नॅनो मॉडलवर उभारण्यात आलेल्या एआय फोटो-एडिटिंग फीचरमधून सुरू झाली आहे. या माध्यमातून सेल्फी तुम्ही थ्रीडी फिगर-स्टाइल फोटोमध्ये बदलू शकता. हे फिचर वेगवेगळ्या पद्धतींनी वापरता येतं. मात्र, याच माध्यमातून आता व्हिंटेज साडी एआय फोटो एआय ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये एक साधारण फोटो घेऊन त्यापासून रेट्रो लूकमधील फोटो तयार केले जात असून याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

दरम्यान, या जेमिनी नॅनो बनाना एआय साडी ट्रेंडवर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा जवळचा विश्वासू, अशी ओळख असलेला शंतनू नायडूने प्रतिक्रिया देत ट्रेंडची खिल्ली उडवली आहे. शंतनू नायडूने प्रतिक्रिया देतानाचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. ‘तुम्ही लोक एवढे आळशी झाले आहात?’, अशा शब्दांत साडी ट्रेंडची खिल्ली उडवली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

शंतनू नायडूने काय म्हटलं?

शंतनू नायडूने या ट्रेंडवर मजेदार प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शंतनू नायडूने म्हटलं की, “तुम्ही भारतात आहात. तुमच्या कपाटात किमान १५ साड्या असाव्यात. पण तुम्ही लोक एवढे आळशी झाले आहात की तुम्हाला एआयवरून फोटो बनवावे लागत आहेत.”

‘जेमिनी बनाना टूल’ कितपत सुरक्षित आहे?

गुगल आणि ओपनएआय अशा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या वापरकर्त्यांनी अपलोड केलेल्या कंटे्टच्या सुरक्षेसाठी टूल्स देतात. मात्र असं असून देखील अशा बाबतीत सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे. जे या फोटोंचा वापर करत आहेत त्यांची भावना काय आहे, यावरच याचा गैरवापर किंवा संमतीशिवाय बदल किंवा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावाने ते वापरला जाण्याची शक्यता कितपत हे ठरते.