दूध, वर्तमानपत्रं इतकंच काय तर हॉटेलमधून खाद्यपदार्थही घरपोच मिळतात. अनेक वस्तूही ऑनलाईन साईट्सवरून घरपोच दिल्या जातात. आता जीवनशैलीतही वेगानं बदल होत आहेत. तसं अनेक घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांची धोरणंही बदलत आहेत. घरपोच सेवेतही झपाट्यानं सुधारणा होत आहे. आता घरबसल्या अनेक वस्तू मिळत असल्यानं ते ग्राहकांनाही सोयीचं झालं आहे. आता इतर वस्तूप्रमाणे डिझेलही घरपोच मिळणार आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. बेंगळुरूमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. तिथे डिझेलही घरपोच दिलं जात आहे. काही आठवड्यांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने अशाप्रकारची सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार १५ जूनपासून बेंगळुरूत ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ९५० लीटर क्षमतेच्या तीन वाहनांतून ग्राहकांच्या घरी डिझेल पोच केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीनं आतापर्यंत ५ हजार लिटर डिझेल ग्राहकांच्या घरी पोच केलं आहे. त्यासाठी सेवाशुल्कही आकारलं जात आहे. १०० लिटर डिझेल पोहोचवण्यासाठी ९९ रुपये सेवा शुल्क आकारण्यात येत असून त्याहून अधिक डिझेलसाठी प्रत्येक लिटरमागे १ रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे. आता डिझेल पोहचवत असलेली कंपनी नवी असून कंपनीला २० मोठे ग्राहक मिळाले आहेत. ज्यामध्ये १६ शाळांचा तर ४ अपार्टमेंट्सचा समावेश आहे. या शाळांच्या साधारण २५० ते ३०० स्कूलबस आहेत.

हे डिझेल मागविण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर करण्यात येणार आहे. याशिवाय फोनवरुन तसेच फ्री अॅप्लिकेशनव्दारेही डिझेल मागवता येणार आहे. धनबाद येथील आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या ३२ वर्षीय आशिषकुमार गुप्ता यांच्या पेट्रोलपंपावरुन डिझेल ग्राहकांना घरपोच दिले जात आहे. याविषयी पेट्रोलियम मंत्रालयाशी मागील काही दिवसांपासून चर्चा चालू होती आणि त्याला मंत्रालयाने उत्तम प्रतिसाद दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home delivery of diesel is start in india bengaluru
First published on: 22-06-2017 at 13:19 IST