नाताळ साजरा करताना ‘ख्रिसमस ट्री’ उभारला जातो. रंगीबेरंगी सजावटीच्या वस्तूंनी तो सुशोभीतदेखील केला जातो. त्यामुळे नाताळच्या दिवसात ‘ख्रिसमस ट्री’ला मोठी मागणी असते. कृत्रिम ‘ख्रिसमस ट्री’ हल्ली सर्वत्र उपलब्ध असतात. जरी कृत्रिम ट्री स्वस्त आणि सहज उपलब्ध असले तरी अनेक ठिकाणी खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ला मोठी मागणी असते. म्हणूनच युरोप, अमेरिकेत अनेक ठिकाणी खास ‘ख्रिसमस ट्री’ची शेती केली जाते.

Video : येथे खेकड्यांच्या स्थलांतरासाठी चक्क रस्ते केले जातात बंद

स्कॉटलंडमधलं एडनमी फार्म हे त्यातलंच एक. येथे स्कॉट पाईन, फर, नॉर्डमन फर, स्प्रूस अशा अनेक प्रकारच्या झाडांची शेती केली जाते. ही झाडे वर्षाला ३० सेंटीमीटर इतकी वाढतात. झाडे ठराविक उंचीची झाली की मग त्यांची विक्रीसाठी कापणी करण्यात येते. ही झाडे दीड ते दोन वर्षांची झाली की त्यांची कापणी करण्यात येते. काही झाडं आणखी पाच सहा वर्ष वाढू दिली जातात. झाडांचा आकार जितका मोठा तितकी अधिक त्याची किंमत असं एकंदर गणित असतं.

अरेरे! ३८ लाख खर्च करून आणलेला ‘ख्रिसमस ट्री’ फक्त दोन आठवडे जगला

दरवर्षी १ डिसेंबरला ‘ख्रिसमस ट्री’ची कापणी करायला सुरूवात होऊन वेगवेगळ्या देशांत निर्यात केली जाते. युरोपात दरवर्षी ८० लाखांहून अधिक खऱ्या ‘ख्रिसमस ट्री’ची विक्री होते. पण यावर्षी मात्र अनेक ‘ख्रिसमस ट्री फार्म’वर मागणी मोठी आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही फार्ममध्ये ‘ख्रिसमस ट्री’ चढ्या दरानंही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.