भारतातून नामशेष झालेले चित्ता जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. काल १७ सप्टेंबरला नामिबिया येथून आठ चित्ते विशेष विमानाच्या मदतीने भारतात आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. या चित्त्यांना ‘टेरा एव्हिया’च्या खास विमानातून नामिबियाहून ग्वाल्हेरला आणण्यात आले, तेथून त्यांना दोन हेलिकॉप्टरमधून कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले.

मात्र, चित्त्यांना या विमानातून भारतात कसं आणलं गेलं असेल हा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. या विमानातील एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये १० तासांच्या प्रवासादरम्यान चित्त्यांना कसे सांभाळण्यात आले हे दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की खास लाकडी पिंजऱ्यात या चित्त्यांना ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, समोर एक सीट आहे, ज्यावर संपूर्ण मोहिमेचे निरीक्षण करणारे वन्यजीव तज्ञ बसले आहेत.

अतिशय वेगवान प्राणी म्हणून ओळख असणाऱ्या या चित्त्यांना प्रवासादरम्यान ‘ट्रँक्विलायझर’ हे बेशुद्धीचे औषध देण्यात आले होते. माहितीनुसार, या औषधांचा प्रभाव तीन ते पाच दिवस टिकू शकतो. प्रवासादरम्यान चित्ते उपाशी होते मात्र त्यांना पार्कमध्ये सोडल्यानंतर त्यांच्या अन्नाची व्यवस्था करण्यात आली.

Video : पोलिसांनी तपासणीसाठी आणलेल्या श्वानाशी राज ठाकरेंची गट्टी, पोलिसांनाच म्हणाले “काय रे याचे लाड…”

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण ग्वाल्हेर विमानतळावर बोईंग विमानातून चित्त्यांना उतरवताना पाहू शकतो. यानंतर त्यांना हेलिकॉप्टरमध्ये नेण्यात आले होते. हेलिकॉप्टरद्वारे या चित्त्यांना ग्वाल्हेर विमानतळापासून १६५ किमी अंतरावर असलेल्या पालपूर नंतर कुनो येथे आणण्यात आले.