लग्न हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा. आयुष्याच्या या नव्या वळणावरील प्रवासात पदार्पण करताना मनात विचारांचे वादळ सुरू असते. एकीकडे आनंद, उत्साह, नव्या प्रवासाची उत्सुकता आणि काहीसा ताण. लग्न सोहळ्याची तयारी बरीच आधीपासून केली जाते. मात्र अचानक एखाद्या घटनेमुळे या आनंदावर विरजण पडले तर…अशीच एक घटना नुकतीच अमेरिकेत घडली. येथील एका जोडप्याचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते. पण हरिकेन हार्वे वादळामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. या वादळी संकटावरही मात करून त्यांनी ठरलेल्या दिवशीच लग्न केले.

या वादळामुळे देशात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कित्येक जण बेघरही झाले. अशा वादळी संकटात लग्नसोहळ्याचे काय करायचे असा प्रश्न शेली आणि ख्रिस हॉलंड या जोडप्यासमोर आ वासून उभा होता. अशा परिस्थितीतही न डगमगता त्यांनी ठरलेल्या दिवशीच लग्न करायचे असा निर्धार केला. अखेर ठरलेल्या दिवशी त्यांनी नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्न केले.

शेलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आम्ही दोघांनीही हा लग्नसोहळा संस्मरणीय करण्यासाठी ६ महिन्यांपासून तयारी केली होती. यामध्ये केक, लग्नाची जागा, केटरींग अशा सर्व गोष्टी ठरल्या होत्या. २ सप्टेंबरला लग्न होते. अचानक वादळ आले आणि सगळ्या गोष्टींवर पाणी फेरले. माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे तर सगळे घरच पाण्यात गेले. इतकेच नाही तर आम्ही ज्या चर्चमध्ये लग्न करणार होतो तेथे पाणी साचले होते. त्या पाण्यातून आम्ही वाट काढली आणि तेथे लग्न केले, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

या वेळी तिने आपल्या लग्नाचा फोटोही शेअर केला आहे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार मानले आहे. पाण्यातून वाट काढतानाचे क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकाराचेही तिने विशेष आभार मानले आहेत. हार्वे आम्ही अखेर जिंकलो, असे तिने पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे. तिच्या या पोस्टला काही वेळातच ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. २० हजार जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे.