प्रत्येकाचं आयुष्य अगदी साधं, सोपं, सरळ नसतं, त्यात काहीना काही संकटं येतच असतात. पण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संकटांशी दोन हात करणं प्रत्येकाला जमलंच पाहिजे. जो हे करू शकतो तोच पुढे यशाची पायरी चढत जातो. म्हणूनच तर भविष्यात अशा लोकांच्या संघर्ष कथा समाजासाठी प्रेरणा बनतात. गॅबी ही १५ वर्षांची बॅलेरिना डान्सर (बॅले नृत्यातील स्त्री नर्तिका) त्यापैकी एक.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅबीचं बालपण इतर लहान मुलांसारखंच हसण्या खेळण्यात गेलं. आपल्या कुटुंबियांसोबत बर्फात गॅबी मज्जा मस्ती करत होती. आईस स्केटिंग करताना तिला छोटासा अपघात झाला. यात तिच्या पायाला दुखापत झाली. पायच तर मुरगळलाय, होईल लवकर बरा असं तिला वाटलं. पण तिच्या नशिबात काही वेगळंच होतं. वयाच्या नवव्या वर्षी तिला हाडांचा कॅन्सर झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. लहानपणांपासून डान्सची तिला आवड होती, पण कॅन्सरमुळे तिला एक पाय कायमचा गमवावा लागला. जिचं आयुष्य आता कुठे सुरू झालं होतं, तिला बरंच काही शिकायचं होतं त्या वयात गॅबीला कायमचं अपंगत्व आलं. आयुष्यात आपण कधीच धावू शकत नाही, नाचू शकत नाही याचं दु:ख तिच्या बालमनाला सतत टोचत होतं. पण तिने हार मानली नाही. एक पाय नसला तरी डान्स शिकण्याची आपली जिद्द तिने सोडली नाही. ती ‘बॅले’ शिकली. पायांच्या बोटांवर शरीराचा तोल सांभाळत बॅले डान्स करायचा असतो. सगळ्यात कठीण नृत्यप्रकारातला तो एक प्रकार. त्यामुळे बॅले डान्सरचं शरीर लवचिक हवंच पण त्याचबरोबर पायांच्या बोटांवर तोल सांभाळण्याची कलाही त्याला अवगत हवी. एक पाय नसल्यामुळे गॅबीलाही अनेक अडचणी येत होत्या. पण तिची जिद्द मोठी होती आणि या जिद्दीपुढे तिने संकटांना गुडघे टेकायला लावलेच. वयाच्या पंधराव्या वर्षी फक्त बॅलेच नाही तर हिप हॉप, जॅझ यासारख्या अनेक नृत्यप्रकारात ती पारंगत झाली.

वाचा : कुरिअर बॉयची ‘बिझनेस मॅनेजर’पर्यंतच्या यशस्वी प्रवासाची कहाणी

वाचा : १०१ वर्षांच्या आजींने धावण्याच्या स्पर्धेत जिंकले ‘सुवर्णपदक’!

कॅन्सरमुळे अनेक लहान मुलांची आयुष्य उद्ध्वस्त झालीत. अशा मुलांना पुन्हा प्रेरणा आणि आत्मविश्वास देण्याचे काम एक स्वयंसेवी संस्था करते. गॅबी या स्वयंसेवी संस्थेचा एक भाग आहे. गॅबी अनेक कॅन्सरग्रस्त मुलांना भेटते त्यांच्याशी संवाद साधते. जसे आपण एवढ्या लहान वयात कॅन्सरवर मात करून स्वत:चे स्वप्न पूर्ण केले, तसेच इतरांनीही पूर्ण करावे यासाठी गॅबी धडपडत असते. तिच्या रुपाने अशा अनेक कॅन्सरग्रस्त मुलांना आशेचा एक नवीन किरण मिळाला आहे हे नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational stories of cancer survival ballerina dancer gabi shull
First published on: 26-04-2017 at 09:19 IST