ब-याचदा असे होते की भूकेने पोटात कावळे ओरडत असतात आणि नेमकी त्याच वेळेस आपल्या आवडत्या हॉटेलबाहेर लांबलचक रांग असते. अशा वेळेस आपला नंबर येईपर्यंत तास -पाऊण तास तरी रांगेत उभे राहण्यावाचून आपल्याकडे पर्याय नसतो. रांगेत असे तिष्ठत उभे राहणे किती कंटाळवाणे असते. कधी कधी सुदैवाने हॉटेलच्या बाहेर प्रतिक्षा करणा-यांसाठी खुर्च्या तरी असतात त्यावर बसून वेळ तरी जातो. पण प्रत्येकवेळी रांगेत बसण्याची सोय असेलच असे नाही. पण रांगेत तासन् तास उभे राहण्या-या ग्राहकांचा विचार करूनच ‘निसान’ या कंपनीने नवे उत्पादन बाजारात आणले आहे. मंगळवारी निसान या कंपनीने आपल्या स्वयंचलित खुर्चीचा व्हिडिओ जगासमोर आणला.
हॉटेलच्या बाहेर एका ओळीत या खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. जशी रांग पुढे सरकते तशा या खुर्च्या देखील आपोआप पुढे सरकतात म्हणजे खुर्च्यांवर बसलेल्या माणसाला रांगेत पुढे चालण्याचे कष्टच पडत नाही. ही खुर्ची ग्राहकाला हॉटेलच्या दारापर्यंत नेऊन सोडते. जसा खुर्चीवरचा माणूस उठून जातो आणि खुर्ची रिमाकी होते तशी ही रिकामी स्वयंचलित खुर्ची रांगेत अगदी शेवटी येऊन थांबते जेणेकरून नव्या माणसाला रांगेत उभे राहण्याचे कष्ट पडणार नाही. जी हॉटेल्स लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत आणि जिथे ग्राहकांची जास्त गर्दी जमते अशा ठिकाणी याचा जास्त उपयोग होऊ शकतो. सध्या जपानमध्ये दीड लाखांहूनही अधिक छोटी मोठी हॉटेल्स आहेत आणि अनेक ग्राहक येथे जेवण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहतात त्यामुळे ही संकल्पना येथे चांगलीच चालेल असे दिसतेय.