केरळमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. वायरrसोबत संपर्क झाल्याने एका ट्रकने रस्त्यातच पेट घेतला. या ट्रकमध्ये भाताचा पेंढा असल्याने आग लगेचच पसरु लागली होती. ट्रक रस्त्यात उभा असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. दुसरीकडे चालक हतबलपणे पाहत उभा असताना एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.

ट्रकला आग लागल्यानंतर चालकाने जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी मारली आणि आता आपला ट्रक आणि सर्व माल जळून खाक होणार म्हणून निराशेने पाहत उभा होता. याचवेळी शाजी वर्गीस यांनी एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे घटनास्थळी धाव घेतली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती.

वर्गीस यांनी ट्रकला आग लागलेली पाहिल्यानंतर तात्काळ आत उडी घेत स्टेअरिंग हाती घेतलं. यानंतर त्यांनी तो जळता ट्रक वस्तीपासून जास्तीत जास्त दूर नेण्यास सुरुवात केली. एका मोकळ्या मैदानात त्यांनी हा ट्रक नेला. वर्गीस यांनी ट्रक मैदानात नेल्यानंतर आग कमी करण्यासाठी तो वेगाने वळवण्यास सुरुवात केली, जेणेकरुन त्यातील पोती खाली पडतील आणि आगीची दाहकता कमी होईल. अग्निशमन दलाचे अधिकारी येईपर्यंत वर्गीस यांचे प्रयत्न सुरु होते.

वर्गीस यांनी प्रसंगावधान दाखवत शहर तसंच लोकांना अनपेक्षित धोक्यापासून वाचवलं. या ट्रकचा स्फोट होऊन काही जीवितहानी, नुकसान होण्याची भीती होती.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पहा व्हिडीओ –

“मी गेल्या २५ वर्षांपासून जड वाहनावर चालक म्हणून काम करत आहे,” असं वर्गीस यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, “मला वाटतं माझा अशा परिस्थिती हाताळण्याचा अनुभव कामी आला”.

४५ वर्षीय अर्गीस यांनी आपला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेर लावल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडून वारंवार कौतुक करणारे फोन येत असल्याचं सांगितलं. अग्निशमल दलानेही वर्गीस यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे. जर वर्गीस यांनी परिस्थिती नीट हाताळली नसती तर खूप मोठं नुकसान झालं असतं ते म्हणाले आहेत.