ओडिशामध्ये पत्नीचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन १२ किलोमीटरचे अंतर पायी कापणाऱ्या दाना मांझीचा व्हिडिओ पाहून सारे देशवासीय सुन्न झाले होते. रुग्णालयाचा ढिम्म कारभार आणि नाकर्तेपणामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहून नेणाऱ्या दाना मांझी आणि त्यांच्या मुलीला पाहून अनेकांचं काळीज पिळवटून निघालं होतं. त्यानंतर देशभरातून दाना मांझी यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला असून गेल्या वर्षभरात त्यांचे आयुष्यच बदलले आहे.

पायपीट करत गावाबाहेर फिरणारे दाना मांझी आता मोटारसायकलवरून मोठ्या ऐटीत गावात फिरतात. मेलाघर गावात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे. दाना मांझी यांनी आपल्या पत्नीच्या निधनानंतर आलमती देई नावाच्या महिलेशी दुसरं लग्न केलं असून ती सध्या गर्भवती आहे. दाना मांझी यांना बहारीनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांनी जवळपास नऊ लाखांची मदत केली होती. त्याचप्रमाणे देशभरातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन दाना यांना आर्थिक मदत केली होती. एका संस्थेनं दाना यांचं बँक खातं उघडून त्यात ठराविक रक्कम देखील ठेवली आहे.

दाना मांझी यांच्या मुली शाळेत शिकत आहेत. या मुलींच्या शिक्षण खर्चाचा भार आणखी एका स्वयंसेवी संस्थेनं उचलला आहे. दाना आपल्या जवळ असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर शेती करत आहेत. एका घटनेनंतर दाना यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. ‘पण, गावकरी मात्र माझा अधिक राग करत आहेत, मी श्रीमंत झालो असं म्हणत गावकरी मला रोज टोमणे मारतात’ असं दाना मांझी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

‘दाना आता पूर्वासारखा राहिला नाही. त्याला सगळे लाभ मिळत आहे जे आम्हाला मिळत नाही. त्याची भरभराट झाली आहे. पण, आम्ही मात्र गरीबच राहिलो’ असं म्हणत एका गावकऱ्यांनी आपलं दु:ख एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे.