काही दिवसापूर्वी आॅस्ट्रेलियातील एक धष्टपृष्ट गाय आपल्या वजन आणि उंचीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. पण आता अमेरिकेच्या मिसीसिपी राज्यातील एका वासराने सगळयांचे लक्ष वेधले आहे. सामन्यत: जन्माला येणारे वासरू हे बकरी इतक्या आकाराचे असते. मात्र, अमेरिकमध्ये मांजराऐवढया आकाराचे वासरु समोर आले आहे. या वासराचे वजन फक्त साडेचार किलोग्रॅमच्या जवळपास आहे. गोंडस अशा वासराची प्रकृती चांगली असून सोशल माध्यमांवर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. वासराला लिल बिल असे नाव देण्यात आले आहे. फेसबुकवर लिलबिलच्या नावाचे वेगळे पेजही तयार करण्यात आले आहे.

जगातील सर्वात लहान असे हे वासरू सोशल माध्यमांवर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. ‘मिरर’च्या वृत्तानूसार या लहानशा गायीचे वजन फक्त साडेचार किलो आहे. वासराचे वजन व आकार पाहून हैराण झालेल्या मालकाने मिसीसीपी स्टेट विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतल्यानंतर हे वासरू प्रकाशझोतात आले. याठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरांनी वासराच्या आरोग्या तपासणी केली. तपासणीमध्ये वासराची प्रकृती चांगली आढळली. पण तिचे वजन इतर वासरांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. डॉक्टरांनी याची माहिती छायाचित्रांसह सोशल माध्यमांवर टाकल्यानंतर लोकांनी प्रेमाचा वर्षाव सुरू केला. मांजराऐवढया आकाराच्या या गायीचे लोक जबदस्त चाहते झाले आहेत.

सामान्य वासराच्या तुलनेत लिलबिलचे वजन १० पटीने कमी आहे, असे डॉक्टरांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे. गायीचे छायाचित्र अनेकांच्या मनाला भावत असून त्यावर वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तिच्या चांगल्या आरोग्यासाठी लोकांकडून प्रार्थना देखील केली जात आहे. लोकांनी यासाठी वेगळे फेसबुक पेज देखील सुरू केले आहे. प्रतिक्रियांचा पाउस पाहता वैद्यकीय चमूने वेळोवेळी लिलबिल बद्दल माहिती देण्यात येईल असे म्हटले आहे. गोंडस अशा या वासराने सोशल माध्यमावरील अनेकांच्या मनाला भूरळ घातली आहे.