फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात आज रात्री ८.३० वाजता फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना दोहा येथील लुसेल स्टेडियमवर होणार आहे. हा महामुकाबला पाहण्याची तमाम फुटबॉल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अर्जेंटिनाचा हुकली एक्का लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा बादशाह एमबाप्पे यांच्यात कॉंटे की टक्कर होणार असल्याने ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर मेस्सीच्या चाहत्यांच्या व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. भारतातही मेस्सीवर प्रेम करणारा मोठा चाहतावर्ग आहे. केरळमध्ये तर मेस्सीच्या चाहत्यांनी नादच केला. अरबी समुद्रात १०० फूट खोल पाण्यात जाऊन मेस्सीचा चक्क कटआऊट लावण्याचा पराक्रमच त्याच्या चाहत्यांनी केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियाही येत आहेत.

लक्षद्विपमधील मेस्सीच्या चाहत्यांनी फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीचा अरबी समुद्रात कटआऊट लावला आहे. मेस्सीच्या चाहत्यांचा हा भन्नाट व्हिडीओ मोहम्मद स्वदिख नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. स्वदीख त्याच्या मित्रांसोबत अर्जेंटिनाच्या जर्सीत मेस्सीचा कटआऊट बोटीतून समुद्रात नेताना दिसत आहे. बोटीतून समुद्रात जात असताना फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाचा झेंडा फडकवतानाही दिसत आहेत. तसेच स्कुबा डायविंगचा किट घालून एक तरुण मेस्सीचा कटआऊट घेऊन लोकेशनवर जाताना दिसत आहे. कटआऊट लावल्यानंतर मेस्सीचे चाहते भन्नाट पोज देतानाही या व्हिडीओत दिसत आहेत.

नक्की वाचा – फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी मेस्सी इथं कुठं फिरतोय? आनंद महिंद्रांनी शेअर केलेला भन्नाट Video पाहून चक्रावाल

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खालिज टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, लिओनेल मेस्सीचा कटआऊट समुद्रात १०० फूट खोल पाण्यात लावला आहे. जर अर्जेंटिना अंतिम सामन्यात पोहोचली, तर मेस्सीचा कटआऊट लावला जाईल, अशी घोषणा अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया सामन्यादरम्यान स्वदिखने केली होती. नवीन इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्वदिख म्हणाला, अर्जेंटिनाने क्रोएशियाचा दारुण पराभव केल्यानंतर मी मित्रांसाठी बिर्याणी पार्टीचे आयोजन केले होते. त्याचवेळी मी मेस्सीचा कटआऊट समुद्रात लावण्याचं ठरवलं होतं. अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये होणारा सामना मेस्सीसाठी खास असणार आहे. कारण देशासाठी त्याच्या हा शेवटचा सामना असणार आहे. “संघाला इथपर्यंत पोहचवण्यात आणि फिफा विश्वचषकात अंतिम सामना खेळून मी माझा प्रवास संपेल, याचा मला आनंद आहे.” असं मेस्सीने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.